

नाशिक : बोगस शिधापत्रिकांना चाप बसावा या उद्देशाने या कार्डला शिधापत्रिकाधारकाचा मोबाईल नंबर लिंक करण्यात येत आहे, यामुळे धान्याचा काळाबाजार रोखण्यास मदत तर होईलच, शिवाय दुकानावर रेशन आल्यावर कार्डधारकाला मेसेजही येणार आहे.
गरजू लाभार्थ्यांना रास्त भावात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासनामार्फत रेशन दुकानातून धान्यवाटप करण्यात येते. यामुळे गरीब जनतेच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटतो. मात्र अनेकवेळा असे आढळून आले आहे की, लाभार्थ्यांचे हक्काचे धान्य लाभार्थ्यांना न मिळता ते थेट काळ्याबाजारात विक्रीस जाते.
रेशन दुकानावर कधी धान्य येते अन् कधी संपते हे लाभार्थ्याला समजत नसल्याने त्याचा काळाबाजाऱ्यांकडून फायदा घेतला जातो. मात्र आता हा काळाबाजार थांबणार असून लाभार्थ्यांना हक्काचे धान्य मिळणार आहे. यासाठी शिधापत्रिकाधारकाचा नंबर रेशनकार्डला लिंक करण्यात येत आहे. यामुळे रेशन दुकानात लाभार्थ्याचे धान्य आल्यावर संबधिताला त्वरीत मेसेज जाणार आहे.
शिधापत्रिकाधारकांचे मोबाईल नंबर अपडेट करण्यात येत असल्याने आपोआपच बोगस लाभार्थी उघडकीस येऊ शकतात. मोबाईल नंबर लिंक केल्याने हक्काचे रेशन मिळण्यास मदत होणार आहे.
बागलाण - 62,249
चांदवड - 37,803
देवळा - 26,074
दिंडोरी - 52,339
मालेगाव शहर - 59,784
नाशिक शहर - 1,07,544
इगतपुरी - 33,689
कळवण - 39,042
मालेगाव - 67,617
नांदगाव - 25,662
मनमाड - 16,822
नाशिक - 71,500
निफाड - 78,385
पेठ - 25,055
सिन्नर - 51,270
सुरगाणा - 32,498
त्र्यंबकेश्वर - 24,037
येवला - 43,288
शिधापत्रिकाधारकाचा नंबर रेशनकार्डला लिंक होणार असल्याने धान्याच्या काळबाजाराला चाप बसेल. मात्र तरीही असा प्रकार घडल्यास पुरवठा विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल.
शिधापत्रिकेला आधार व मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी रेशनदुकानदाराकडे रेशनकार्ड, आधारकार्डची झेरॉक्स व मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे.
जिल्ह्यात शिधापत्रिकाधारकांची संख्या आठ लाख 74 हजार 409 इतकी आहे. त्यापैकी आठ लाख 29 हजार 757 रेशनकार्ड लिंक झाले आहेत. सध्या जिल्ह्यात शिधापत्रिकेला मोबाईलनंबर आणि आधारकार्ड लिंक करण्याची मोहीम सुरू आहे.