

नाशिक : मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि टाटा ट्रस्ट व नाशिक महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने त्रिरश्मी लेण्यांच्या पायथ्याशी बॉटनिकल गार्डनची उभारणी करण्यात आली आहे. या उद्यानाच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा नाशिकमध्ये आले होते. बॉटनिकल गार्डनने टाटांनाही चांगलीच भुरळ पाडली होती. 'या उद्यानाने मला प्रभावित केले असून, एक इनोव्हेटिव्ह प्रकल्प म्हणून मी याकडे पाहतो. भारतात अशा उद्यानांची आवश्यकता आहे, अशा शब्दांत टाटांनी या प्रकल्पाचे कौतुक केले होते. रतन टाटांचे निधन झाले असले तरी या उद्यानाच्या रूपाने त्यांच्या स्मृती नाशिककरांच्या मनात चिरंतन राहणार आहेत.
राज ठाकरे आणि रतन टाटा यांचे वैयक्तिक संबंध जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे होते. राज ठाकरेंच्या हाती जेव्हा नाशिक महापालिकेची सत्ता आल्यानंतर सीएसआरअंतर्गत शहरात विविध प्रकल्पांची उभारणी करताना नाशिक-मुंबई महामार्गावरील अस्तित्वातील पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाचा कायापालट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या उद्यानाची संकल्पना त्यांनी रतन टाटा यांच्यासमोर मांडली. तेव्हा त्यांनी तातडीने उद्यानासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शविली. टाटा ट्रस्टच्या आर्थिक सहाय्यातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्यासाठी वनविभागाची ही जागा वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. ३० जानेवारी २०१७ रोजी रतन टाटा यांच्या हस्तेच या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. फुलपाखराची प्रतिकृती असलेले उद्यानाचे भव्य प्रवेशद्वार पाहून टाटा आनंदी झाले होते. राज ठाकरे यांच्यासमवेत इकोफ्रेण्डली कारमधून त्यांनी उद्यानात फेरफटका मारला. उद्यानात उभारलेला 'बोलक्या झाडा'चा पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा शोदेखील टाटांनी पाहिला. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या या प्रकल्पाचे तोंडभरून कौतुक केले होते. 'अशा प्रकारच्या उद्यानांची शहरांना गरज आहे. या उद्यानाने मला प्रभावित केले आहे. एक इनोव्हेटिव्ह प्रकल्प म्हणून मी याकडे पाहतो. भारतात अशा उद्यानांची आवश्यकता आहे, असे नमूद करत राज ठाकरेंनी ही संकल्पना मांडली. त्यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते. श्वास घ्यायला मुबलक ऑक्सिजन आणि सुखद हिरवळ ही नाशिकच्या नागरिकांना मिळालेली भेट आहे. खूप आनंद आहे की आम्ही या कामात हातभार लावू शकलो आहोत, अशी भावना टाटा यांनी व्यक्त केली होती.
रतन टाटांनी बॉटनिकल गार्डनच्या रूपाने नाशिककरांना दिलेली भेट त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवणारी ठरेल. आजही या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर टाटांच्या हस्ते उद्घाटन केलेला फलक पर्यटकांचं लक्ष वेधून घेणारा ठरतो. २०१७ मध्ये रतन टाटा जेव्हा या उद्यानाच्या उद्घाटनासाठी नाशिकला आले होते तेव्हा नाशिककरांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गेल्या काही वर्षांत या उद्यानाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. उद्यानाच्या पुनर्विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.