

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
वाढती महागाई, जीवनाआवश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले दर आणि सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सिंधी समाज सेलचे महाराष्ट्रप्रमुख रतन चावला यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
चावला यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यात साखर, तांदूळ, खाद्यतेल, गहू, डाळी आणि इतर सर्वच जीवनाआवश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. बहुतांश वस्तूंच्या किमतीत २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत गणेशोत्सव, दसरा, पितृपक्ष, दिवाळी, ईद आणि नाताळ आहे.
वाढलेल्या महागाईमुळे सामान्य आणि गरीब कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे. राज्य सरकार 'लाडकी बहीण' योजनेतून महिलांना दरमहा १,५०० रुपये देत आहे; परंतु दुसरीकडे जीवनाआवश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशातून त्यापेक्षा दुप्पट रक्कम बाहेर पडत आहे. एका हाताने मदत करून दुसऱ्या हाताने जनतेची लूट केली जात आहे.
वस्तूंचे उत्पादन, मागणी आणि पुरवठा यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, हे सरकारचे अपयश दर्शविते. सध्याचे सत्ताधारी केवळ राजकीय फोडाफोडीत आणि स्वतःची सत्ता टिकवण्यात व्यस्त असून, राज्यकर्त्यांचे सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप चावला यांनी केला आहे.
प्रमुख मागण्या
सणासुदीच्या काळात साखर, तेल, गहू, तांदळाचे दर तातडीने नियंत्रित करावेत.
राशन व्यवस्थेमार्फत सणांसाठी विशेष अन्नधान्य किट सवलतीच्या दरात द्यावे.
नफेखोरी, साठेबाज विरोधात अन्न व नागरी पुरवठा विभागाने कारवाई करावी.