

नाशिक : निल कुलकर्णी
बीट, हळद, भृंगराज, पळसाची फुले आदींपासून तयार केली जाणारे रंग हे रसायनमुक्त असतात. 'हर्बल' रंगनिर्मितीची प्रक्रिया कष्टप्रद असून, त्याच्या किमतीही अधिक आहेत. रंगोत्सवासाठी 'हर्बल'च्या नावाखाली विकले जाणारे रंग म्हणजे ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार असून, बाजारपेठेत २५ ते ३० रुपयांना हर्बल म्हणून विकले जाणारे रंग रसायनयुक्तच असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवले आहे.
नागरिकांमध्ये वाढत जाणारी जागृती यामुळे प्रत्येक जण आरोग्याबद्दल सजग झाला आहे. रसायनयुक्त रंगाचे त्वचेवर होणा-या घातक परिणामांबद्दल वाढलेली जागृती यामुळे प्रत्येकालाच आरोग्याला हानी न पोहोचवता रंगोत्सवाचा आनंद घ्यायचा असतो. त्यासाठी बाजारात अनेक हर्बल रंग उपलब्ध झाले आहेत. मात्र, विक्रेते म्हणतात म्हणून ग्राहकही 'असे' रंग विकत घेताना दिसत आहेत. त्यांची शहानिशा न करता घेतलेल्या तथाकथित 'हर्बल रंगां'मध्ये रसायनाचा भडीमार असतोच. वास्तविक शुद्ध हर्बल रंगांना वेगळा सुगंध असतो जो नैसर्गिकरीत्या जाणवतो. मात्र 'हर्बल' म्हणून विकल्या जाणाऱ्या अशा रंगांना वेगळाच रसायनयुक्त गंध येतो. त्यामुळे त्याची चिकित्सा न करता वापरले जाणारे रंगही आरोग्यास अपायकारक ठरू शकतात अशी माहिती अनेक वर्षांपासून आपल्या संशोधन केंद्रात हर्बल रंगनिर्मिती करणारे वैद्य विक्रांत जाधव यांनी दिली.
सिव्हर कलरच्या वॉर्निशयुक्त रंगांसारख्या रंगामध्ये 'ॲल्युमिनियम ब्रोमाइड' सारखे अत्यंत घातक विषारी रसायन असते. त्यामुळे त्यांचे त्वचेसह आराेग्यावर दुष्परिणाम होतातच असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. शिवाय इतरही रंगांमध्ये रसायनेच असतात. त्यामुळे हर्बल म्हणून दिले जाणारे रंग हे केवळ ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक करणारे असून, दिशाभूल करणारी घातक रसायने असल्याचे निरीक्षण डॉक्टर, अभ्यासक नोंदवत आहेत.
हिरवा रंग : पुदिना आणि कोथिंबीर टाकलेल्या पाण्याचे बाष्पीभवन करून उरलेली पावडर. हिरवा रंगासाठी पुदिन्याने अंगाला खाज येते म्हणून त्यात कोथिंबीर मिसळतात.
केशरी : केशरी पळसाच्या पानापासून केशरी रंग होतो. पळसाची फुले थंड असतात. शरीराला गारवा देण्यासाठी रंगपंचमीसाठी त्याचा वापर केला जातो.
लाल रंग : बीट व टोमॅटो : बीट आणि टोमॅटाेपासून लाल रंग होतो.
पिवळा रंग : हळदीपासून पिवळा रंग होतो. पिवळ्या पळसापासूनही पिवळा रंग हाेतो परंतु तो वृक्ष हल्ली दुर्मीळ झाला आहे. (ममदापूर(येवला) येथील काळवीट अभयारण्यात हा वृक्ष आहे. नाशिक सीमेवर वैजापूर सीमेवर)
काळा रंग : भृंगराज (माका) पासून काळा रंग तयार केला जातो.
त्वचेमार्फत शरीरात औषधी गुणधर्मांचे तत्त्व शरीरात पोहोचवण्याची रचना आयुर्वेदात सांगितली आहे. हर्बल रंग शरीर, मनास आरोग्यकारक असतात. रासायनिक रंगांना सु्गंध नसतो. 'हर्बल' रंग गुलाबजलामुळे सुगंधित असतात. बाजारात हर्बल म्हणून विकले जाणारे रंग हर्बल असतीलच याची हमी नसते.
वैद्य विक्रांत जाधव, आयुर्वेद तज्ज्ञ, नाशिक.