

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड आणि गोदाघाट परिसरात सुमारे दोन कोटी रुपये खर्चून आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उज्जळून निघाला असताना, भाविकांचे श्रद्धास्थान असलेले काळाराम मंदिर मात्र अंधारात राहिल्यामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, देशभरातून आलेल्या संत-महंतांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
रामकुंड येथे धर्मध्वजारोहण आणि सायंकाळी महागोदाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त पंचवटीतील धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांची संख्याही वाढली होती. रामतीर्थ येथे दर्शनासाठी येणारे अनेक भाविक काळाराम मंदिरात दर्शनासाठी जातात. त्यामुळे अशा ऐतिहासिक सोहळ्याच्या वेळी मंदिर परिसरही आकर्षक रोषणाई अपेक्षित होती.
राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः काळाराम मंदिरात जाऊन व्यवस्थेची पाहणी केली होती. व्हीव्हीआयपी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असतानाही विद्युत रोषणाईकडे मात्र अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याचे चित्र दिसून आले.
कुंभमेळा पंचवटीतील रामकुंड, काळाराम मंदिर, सीतागुंफा, गोदाघाट यांसारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांशी जोडलेला आहे. कोट्यवधींच्या खर्चातून रामकुंड परिसर उज्जळवण्यात आला असताना काळाराम मंदिराकडे झालेल्या दुर्दुर्लक्षाबाबत भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या काळाराम मंदिरावर विद्युत रोषणाई नसणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरही काळाराम मंदिराचे बोधचिन्ह वापरण्यात आले आहे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी देशभरातून आलेले भाविक काळाराम मंदिरात दर्शनासाठी आवर्जून येतात. अशा प्रमुख धार्मिक स्थळावर रोषणाई केली नसल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
— मंदार जानोरकर, विश्वस्त, काळाराम मंदिर संस्थान