Ramdas Athawale | देवळाली, भुसावळ, श्रीरामपुरसह 8 जागा द्या
नाशिक: विधानसभेच्या निवडणुकीत देवळाली, भुसावळ, श्रीरामपुरसह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी 2 अशा एकूण 7 ते 8 जागा आम्हाला देण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीकडे केली आहे.
64 व्या धम्मचक्र परिवर्तनदिन सोहळ्यानिमित्त आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले नाशिकमध्ये आले असता माध्यमांशी बोलतांना त्यांनी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी ही मागणी केली. पत्रकार परिषदेस आरपीआयचे जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे उपस्थित होते.
मंत्री आठवले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 'संविधान खतरेमे' असा नारा देत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात जागा बळकावल्या. विधानसभेत मात्र विरोधकांची ही चाल आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. विधानसभेत आम्ही विरोधकांचे षडयंत्र उधळून लावू. 2012 मध्ये भाजप आणि शिवसेनेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने साथ दिल्यानेच महायुती तयार झाली. आता महायुतीत आम्हाला मानाचे स्थान मिळावे ही अपेक्षा आहे. यासंदर्भात आम्ही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बानवकुळे यांच्याकडे 20 जागांची यादी सोपविली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बोलणी झालेली आहे. महायुतीतील तीनही पक्षांनी आम्हाला प्रत्येकी 3 जागा द्याव्यात. बौध्दांची मते महायुतीला मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा केला. महायुती सरकारने लाडकी बहीण, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण, मुस्लिम मदरशांच्या अनुदानात वाढ आदी लोकप्रिय योजना राबविल्याने पुन्हा एकदा महायुतीच सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी केला.
राज ठाकरेंना महायुतीत घेऊ नका
राज ठाकरेंना महायुतीत घेतल्यास त्याचा फायदा राज ठाकरेंना होणार नाही. राज ठाकरे महायुतीत येत असतील तर त्यांना घेऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे असा सल्ला यावेळी मंत्री आठवले यांनी महायुतीला दिला.