

नाशिक : रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामुहिकरित्या नमाजपठण केले. यावेळी हजारोंच्या जनसमुदायाने अल्लाहकडे जगभरातील मानव जातीचे कल्याण व्हावे व भारताची प्रगती व्हावी यासाठी विशेष दुआ मागितली. शहरासह जिल्ह्यात सोमवारी (दि. ३१) रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी १०.३० वाजता शहर - ए - खतीब हाफिज हिसामुद्दिन अशरफी यांच्या नेतृत्वात नमाज पठण करण्यात आले. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने सोमवारी ईद-उल-फित्र साजरी करण्यात आली. २९ रोजे (उपवास) पूर्ण झाल्यानंतर रमजान महिन्याची सांगता झाली आणि शाबान महिन्याच्या प्रारंभी मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली. शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम धर्मियांनी सामूहिक नमाज अदा केली. रणरणत्या उन्हातही आबालवृद्धांनी श्रद्धेने उपवास व उपासना केली. ईदच्या निमित्ताने मशिदींना आकर्षक रोषणाई करण्यात आली होती, तर शहरभर उत्साहाचे वातावरण दिसून आले. ईदच्या पूर्वसंध्येपासूनच गळाभेट आणि ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला होता. तसेच, खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. यावेळी भारतासह संपूर्ण जगात शांतता व सौहार्द राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
रमजान ईदनिमित्त ‘शिरखुर्मा’ल्या चांगली मागणी पहावयास मिळाली. दूध आणि सुकामेवा एकत्र करुन तयार केल्या जाणाऱ्या या पदार्थाचा तसेच शेवयांचा सुगंध दरवळत होता. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या नातेवाईक, मित्र परिवारास मुस्लिम बांधवांनी शिरखुर्मा देत तोंड गोड केले. तसेच सोशल मीडियावर ‘ईद मुबारक’चा वर्षाव सुरू होता.
ईदगाह मैदानावरील नमाजपठणासाठी सकाळी नऊ वाजेपासूनच गर्दी होण्यास प्रारंभ झाला. ईदगाहकडे येणारे सर्वच रस्ते फुलले होते. पारंपरिक पठाणी कुर्ता, डोक्यावर इस्लामी फेटा, टोपी अशा पोशाखात हजारोंच्या संख्येने नागरिक जमले होते. मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारांभोवती शुचिर्भूत (वजु) होण्यासाठी पाण्याचे नळ तात्पुरते बसविण्यात आले होते.
ईद साजरी हाेत असताना कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची विशेष खबरदारी पोलिसांनी घेतली होती. ईदगाह मैदानासह शहरात चोख बंदोबस्त तैनात होता. परिसरातील इमारतीवरून शस्त्रधारी पोलिस दुर्बिणीच्या माध्यमातून संपूर्ण मैदानाची टेहेळणी करत होते. तसेच साध्या वेशातील पोलिसांनीही लक्ष ठेवले होते.