

नाशिक : मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची रविवारी (दि. ३०) चंद्रदर्शनाने सायंकाळी सांगता झाल्याने, सोमवारी (दि.३१) सर्वत्र ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जात आहे.
शहरातील शहाजहाँनी ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता पारंपरिक पद्धतीने सामूहिक नमाजपठण केले जाणार असल्याचे शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी अधिकृतरीत्या विभागीय चाँद समितीच्या बैठकीत जाहीर केले.
पुण्यकर्म व उपासनेसोबत मानवतेची शिकवण देणारे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रमजान'चे २९ दिवस पूर्ण झाले. रविवारी (दि.30) कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे काही उपनगरांमध्ये सायंकाळी चंद्रकोर मुस्लीम बांधवांना बघता आली. याबरोबरच रमजान पर्वाची सांगता होऊन पुढील उर्दू महिना शव्वालची १ तारीख मोजली गेली. शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी तत्काळ शाही मशिदीमधून चंद्रदर्शन घडल्याने ईद साजरी करण्याची घोषणा केली. चंद्रदर्शन घडल्यामुळे ईद साजरी करण्याविषयीचा संभ्रम दूर झाला. इस्लामी कालगणना नूतन चंद्रदर्शनावर अवलंबून असल्यामुळे चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे.
रमजान पर्वकाळात मुस्लीम बांधवांनी महिनाभर निर्जळी उपवास करत अल्लाहची उपासना (इबादत) केली. यावर्षी संपूर्ण रमजान पर्व मार्च महिन्यात उन्हाच्या तीव्रतेत पार पडले, तरीदेखील आबालवृद्धांचा उत्साह बघावयास मिळाला. शाही मशिदीतून चंद्रदर्शनाची घोषणा होताच उपस्थितांनी एकमेकांना 'चाँद मुबारक'च्या शुभेच्छा दिल्या. याबरोबरच 'तरावीह'च्या विशेष नमाजपठणाचाही समारोप करण्यात आला. जे समाजबांधव मागील दहा दिवसांपासून तसेच महिनाभरापासून मशिदीत मुक्कामी थांबले होते, त्यांना सन्मानाने कुटुंबीयांकडून घरी आणले गेले. काही ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत केले गेले.