

पंचवटी : कामदा एकादशीला राम आणि गरुड रथयात्रेचे परंपरा असून, श्री काळाराम मंदिर संस्थानकडून ७० वर्षानंतर गरुड रथाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यात रथाच्या वरच्या अग्रभागी असलेल्या पूर्वापार गरुडाच्या मूर्तीचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. त्या जागी आता फायबर ग्लासमधील गरुडाची पूर्णाकृती मूर्ती नंदन दीक्षित यांनी संस्थांना भेट दिली.
गरुड रथाचे शहरातील पारंपरिक मार्गावरुन भाविकांना दर्शन घडवून आणण्याची प्रमुख जबाबदारी गरुड रथाचे वंश परंपरागत मानकरी बाळंभट दीक्षितांचे वारसदार असलेल्या दीक्षित परिवाराकडे असते. ही परंपरा शेकडो वर्षांची आहे. दीक्षित परिवाराच्या मार्गदर्शनाखाली श्री अहिल्याराम व्यायाम शाळेचे पदाधिकारी आणि बोलोपासक गरुड रथातील पादुकांचे दर्शन भाविकांना घडवून आणतात.
गरुड मूर्तीचेही नूतनीकरण करण्यात आले असून, फायबर ग्लासमधील गरुडाची पूर्णाकृती मूर्ती दीक्षित परिवारातर्फे नंदन दीक्षित यांनी यावर्षीचे सालकरी हेमंत बुवा पुजारी, संस्थांचे विश्वस्त धनंजय पुजारी आणि नरेश पुजारी यांच्याकडे सुपूर्त केली. याप्रसंगी हेमंत बुवा पुजारी, नंदन दीक्षित, रवींद्र दीक्षित, पवन दीक्षित, विश्वस्त धनंजय पुजारी, नरेश पुजारी, महंत सुधीरदास पुजारी, ॲड. अविनाश भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.
फायबर ग्लासमधील गरुडाची पूर्णाकृती मूर्ती ही तीन फूट रुंद तर दोन फूट उंच आहे. ही आकर्षक मूर्ती मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार गणेश क्षीरसागर यांनी घडवली आहे.
दोनही रथाची परंपरा १७८६ सालापासून आहे. गरुड रथाचे वंश परंपरागत मानकरी बाळंभट दीक्षितांचे वारसदार असल्याने आमच्या सहाव्या पिढीने ही परंपरा कायम ठेवलेली आहे. या वर्षीपासून ही नवीन मूर्ती रथाचे सारथ्य करणार आहे.
नंदन दीक्षित, गरुड रथाचे वंश परंपरागत मानकरी, नाशिक.