

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरत्या वर्षाला निरोप देताना त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेतले. माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या समवेत त्यांची पत्नी व मुलगी उपस्थित होत्या.
कोविंद येणार असल्याने मंगळवारी (दि.31) सकाळपासूनच मंदिर परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुपारी दोनच्या सुमारास त्यांचे आगमन झाले. यावेळी कोंविद यांनी मंदिर सभामंडपात पूजा अभिषेक केला. पौरोहित्य विश्वस्त तथा पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी केले. यावेळी आपण देश व विश्वाच्या सुख- समाधानासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. तसेच त्र्यंबकराजाच्या दर्शनाने कृतार्थ झाल्याची भावना व्यक्त केली. मंदिर विश्वस्त कैलास घुले, विश्वस्त रूपाली भुतडा यांनी कोविंद यांचे स्वागत केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, प्रांताधिकारी पवार, तहसीलदार श्वेता संचेती, नगरपरिषदेचे अमोल दोंदे, नितीन शिंदे उपस्थित होते. पोलीस उपअधिक्षक वासुदेव देसले, निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.