

देवळा : एक एप्रिल नंतर विकलेल्या कांद्याला प्रती क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे, अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खा. राजू शेट्टी यांनी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी हे सोमवारी ( दि २०) रोजी जिल्हा दौऱ्यावर आले असताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर बोलताना केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
शेतकऱ्यांबद्दल अन्यायी वागणूक देणाऱ्या सरकारच्या विरोधातील असंतोष व्यक्त व्हायला हवा. शेतकरी हिताचे निर्णय घ्यायला शासनाला भाग पाडण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याशिवाय आता गत्यंतर नाही असा इशाराही राजू शेट्टी यांनी देवळा येथे दिला.
शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणामूळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे. त्यामुळे जीवन संपवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कांद्याच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन द्यावे, नाफेड आणि एनसिसिएफने थेट बाजार समितीच्या आवारातुनच खरेदी करावी, कांद्याला किमान तीन हजार रूपये भाव द्यावा, तसेच एक एप्रिल नंतर विकलेल्या कांद्याची होणाऱ्या कांद्याला प्रती क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे अशी जोरदार मागणी राजु शेट्टी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोलताना केली.
महायुती शासनाने कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागविणारी एनडीसीसी बँक पूर्ववत चालू होण्यासाठी शासनाने ६३५ कोटी रु.बिगरव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे यावरही भर दिला.
मी आतापर्यंत तीनवेळा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा गनिमी काव्याने विधानभवनासमोर कांदा, कापूस, आणि दुधाचे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, असेही शेट्टी यावेळी म्हणाले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष निवृती गारे पाटील, राजु शिरसाट, युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार शिरसाट, स्वाभिमानी पक्षाचे युवा आघाडीचे अध्यक्ष कृष्णा घुमरे, निफाड तालुका अध्यक्ष गजानन घोटेकर, सिन्नर तालुका अध्यक्ष आत्माराम पगार, अशोक शेवाळे, कळवण तालुका अध्यक्ष रामक्रुष्ण जाधव, संजय जाधव, अण्णा पाटील, प्रशांत पवार, रविंद्र शेवाळे, बंडु आढाव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.