

सिन्नर (नाशिक) : आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथून थेट अयोध्या, तिरुपती, कटरा, वाराणसी आणि अजमेर येथे जाणारी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
आगामी काळात 2027-2028 नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार असून देशभरातील भाविक सिंहस्थाच्या आधीपासूनच नाशिकला येणार आहेत. त्यांची सोय व्हावी म्हणून थेट नाशिकहूनच रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत त्यांच्याकडे केली आहे. आपली विनंती मान्य करत याबाबत संबंधित संचालनालयाला सविस्तर माहिती घेण्याबाबत सूचित केले असल्याचे पत्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार वाजे यांना दिले आहे.