

नाशिक : वरळीत झालेला विजयी मेळावा केवळ मराठी भाषेपुरताच मर्यादित होता. त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे स्पष्ट करत नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान राजकीय परिस्थिती बघूनच शिवसेना (उबाठा) बरोबर युतीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
एखाद्या पक्षासोबत युती करण्याचा निर्णय असा काही घाईगडबडीत होत नाही, ही मोठी प्रक्रिया असते, असे सांगत राज ठाकरे यांनी युतीबाबत सस्पेन्स वाढविल्याने ‘उबाठा’ नेत्यांची धडधड वाढली आहे.
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत इगतपुरी येथे मनसेच्या तीनदिवसीय चिंतन शिबिराला सोमवार (दि. 14) पासून प्रारंभ झाला. यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना राज ठाकरे यांनी भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का, या प्रश्नावर मोठे विधान केले. चौथीपर्यंत शिक्षण घेणार्या मुलांवर तिसर्या भाषेची सक्ती गैर असल्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून कोणतेही राजकारण न करता एका विशिष्ट चौकटीमध्ये आम्ही लढा दिला आणि विजय मिळवला. त्यामध्ये कोणतेही राजकारण नव्हते, असे सांगत त्यांनी मनसेला टाळी देण्यास आतुर झालेल्या ‘उबाठा’ नेत्यांना अप्रत्यक्षरीत्या सबुरीचा सल्ला दिला.
गुजरात किंवा अन्य कोठेही हिंदी व तिसर्या भाषेची सक्ती नाही; मग महाराष्ट्रात का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडून केवळ त्रिभाषा सूत्रासंदर्भामध्ये अहवाल आला होता, निर्णय झाला नव्हता, अशा शब्दांत राज यांनी उद्धव ठाकरेंचे समर्थनही केले. प्रत्येक पालकाचे स्वप्न आहे की, आपल्या मुलाला मराठीसोबत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण हवे. त्यामुळे खरोखरच सरकारला मराठी शाळा टिकवायची असेल, तर सेमी इंग्लिश करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी मनसे नेते बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, उपाध्यक्ष रतनकुमार इचम, सलीम शेख आदी उपस्थित होते.