

इगतपुरी (नाशिक) : नाशिक जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री असतांनाही जिल्ह्यातील अनेक नागरी प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच महानगरपालिकेतील अनेक भ्रष्टाचार उघड होत असतांनाही सत्ताधारी मौन बाळगून आहेत.
नव्याने झालेले महामार्ग, स्मार्टसिटी, उड्डाणपुले आदी रस्त्यांवर मोठ- मोठ्या खड्डे पडले आहेत. या प्रश्नांवर सत्ताधारी कोणतीही उपाय योजना करताना दिसत नाहीत, अशावेळी कार्यकर्त्यांनी मैदानात उतरून लोकांचे प्रश्न सोडवावे अशा सुचना महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाश्वभूमीवर मनसेच्या तीन दिवशीय राज्यस्तरीय चिंतन शिबिराला सोमवारी (दि. १४) पासून इगतपुरीत प्रारंभ झाला. यावेळी राज यांनी पदाधिकारी- कार्यकर्त्यांमध्ये कानमंत्र दिला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पहिल्याच दिवशी ठाकरे यांचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी स्वागत केले. शिबिराला अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर, सुदाम कोंबडे, ॲड. रतनकुमार इचम यांच्यासह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. विभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर, पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद गोसावी आणि पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.