

येवला : पुढारी वृत्तसेवा
अर्धा पावसाळा उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून आणि जुलै महिन्यात पेरण्या तर पूर्ण झाल्या, मात्र आता ऑगस्टही संपत आला तरी पावसाने दडी मारल्याने शेतातील उभी पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. तल्हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आता स्प्रिंकलरच्या (तुषार सिंचन) माध्यमातून कृत्रिमरीत्या पाणी देण्याची कसरत करावी लागत आहे.
शेतात सोयाबीन, कापूस, मका आणि तूर, बाजरी यांसारखी पिके जोमात आली. मात्र, ऐन वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या टप्प्यात पावसाची मोठी उघडीप दिल्याने भूक वाढलेल्या बाळसेदार पिकांना पाण्याची गरज भासत आहे.
जमिनीतील ओलावा पूर्णपणे सुकल्यामुळे पिके सुकू लागली आहेत. जर पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला नाही तर पिकांचे प्रचंड नुकसान होऊन उत्पन्नात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हीच परिस्थिती येवला परिसरातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये असल्याचे चित्र आहे. लवकरच पावसाचे आगमन न झाल्यास पिके करपण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात काही प्रमाणात पावसाची स्थिती समाधानकारक असली तरी जिल्ह्याचा पूर्वभाग कायमच मोठ्या प्रमाणात अवर्षणग्रस्त असल्याचे दरवर्षी दिसून येते.
"आम्ही मोठ्या आशेने खते आणि बियाणे आणून पेरणी केली होती. सुरुवातीला पाऊस चांगला झाला पण आता ऐन पिके वाढीच्या काळात पावसाने दडी मारली आहे. विहिरीचे पाणी वापरून स्प्रिंकलर चालवावे लागत आहेत. पाऊस लांबला तर पेरणीचा खर्च निघणेही कठीण होईल."
— उज्ज्वल जाधव, शेतकरी, अंदरसूल
"पावसाअभावी सोयाबीन आणि कापसाची पिके सुकू लागली आहेत. पिके वाचवण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार घ्यावा लागत आहे. पिके चांगले असून, पाणी देता येत नाही. पाणी असून लाइट टिकत नाही. सोलर चालू करायला ऊन पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत."
— राजेन्द्र सोनवणे, शेतकरी, अंदरसूल
पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना विहिरी किंवा कूपनलिकांच्या (बोअरवेल) भरवशावर सिंचन करावे लागत आहे. वीज पुरवठ्याचे अनिश्चित वेळापत्रक आणि अवेळी मिळणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जाऊन तुषार सिंचनाचे पाईप बदलावा लागतात.
ज्या भागात वीज उपलब्ध नाही तिथे डिझेल पंपाचा वापर करावा लागत असल्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. मेहनतीने फुलवलेली पिके डोळ्यांदेखत सुकताना पाहणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत वेदनादायी ठरत असून निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला.