

सिडको (नाशिक) : सिडको भागात रविवारी दुपारी जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक भागांतील रस्त्यांवर पाणी साचले असून, नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. विशेषतः रहदारीच्या मुख्य रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सिडकोतील ठाकरे क्रीडांगण, गणेश चौक, इंद्रनगरी, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच अंबड गाव व अंबड औदयोगिक वसाहतीतील अनेक रस्ते जलमय झाले. रविवारच्या जोरदार पावसात ड्रेनेज व्यवस्थेचे पूर्णतः अपयश दिसून आले. साचलेल्या पाण्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. मुलांना व वृद्ध नागरिकांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे.
पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई व ड्रेनेज दुरुस्तीचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली होती. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा नीट होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.