नाशिक (देवळा) : तालुक्यात रविवारी (दि. १३) रोजी सायंकाळी पश्चिम भागात अतिवृष्टी झाल्याने कोलती नदीला पूर आला. नदी उगमस्थानाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीचे पाणी साचल्याने अंदाज न आल्याने पुराच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये हनुमंतपाडा येथील एक जण वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे.
खर्डे येथे नव्याने बांधण्यात आलेला फरशी पूल देखील वाहून गेला असून ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर परिस्थितीबाबतची माहिती प्रशासनाला कळविण्यात आलेली आहे.
तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून जिल्ह्यासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी पाणी साचल्याने पिके धोक्यात आली आहे. त्यात रविवारी (दि. १३) रोजी खर्डे परिसरात हनुमंतपाडा येथे सायंकाळी विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस सुरु झाल्याने कोलती नदीला पूर आला. या पूर पाण्यात हनुमंत पाडा येथील एक युवा शेतकरी रात्रीच्या वेळी दुचाकीने घरी परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची घटना घडली आहे. याबाबत ग्रामस्थांनी तलाठ्यांना माहिती दिली असून, सदर इसमाचा नदीकाठच्या भागात स्थानिक नागरिकांनी शोध मोहीम सुरू केली आहे.