चांदवड : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या परतीच्या पावसामुळे काढणीला आलेले कांदे, मका, सोयाबीन पिकांसह भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानीचे शासकीय यंत्रणेद्वारे पंचनामे केले जात आहेत. मात्र, शासकीय मदत कधी आणि किती मिळणार याविषयी कोणतीही शाश्वती नसल्याने शेतशिवारात अस्वस्थता आहे. (Farmers are in financial trouble as nature has deprived them of the food that comes with them)
वर्षभराचा कडक दुष्काळ भोगल्यानंतर यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली. त्याने गतवर्षाची कसर भरून काढू, या इर्षेने बळीराजाने हंगामाची तयारी केली होती. मका, सोयाबीन, कांदे पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली. गेले दोन-अडीच महिने शेतकऱ्यांनी पिकांची निंदणी, खुरपणी, औषधे, खते, फवारणी करत पिकं घेतले. ऐन काढणीचा हंगाम आला असतानाच निसर्ग कोपला. आठवड्याभरापासून मुसळधार पावसाची झड लागल्याने पिकं झोडपली जाऊन मातीत मिळाली. कांदे सडले. नवीन लावलेल्या कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. महागडी औषध फवारणी करूनदेखील रोग जात नाही. यातून लाल कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मका पीक शेतातच खराब झाले आहे. मक्याच्या बीटीला मोड आले. चारादेखील सडल्याने जनावरांसाठी चाऱ्याचा तुटवडा भासणार आहे. पावसामुळे झालेला पीकपेरा अतिपावसाने हिरावला गेल्याने गुंतवणूक आणि श्रम मातीमोल झालेत. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि रब्बी हंगाम कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
बहरलेला मका, सोयाबीन साधारणतः तीन ते चार लाख रुपये इतके उत्पन्न देऊन गेला असता. मात्र, आता एक रुपयादेखील होणार नाही. पिकांसह शेत पूरपाण्यात वाहून गेले. शेत पुन्हा तयार करण्यासाठीच लाखोंचा खर्च येणार आहे. पहिलेच कर्ज काढून पिकांची लागवड केली होती. आता संसार कसा उभा करायचा या चिंतेने हैराण केले आहे.
पंढरीनाथ पवार, शेतकरी राहुड, नाशिक.
परतीच्या पावसाने कहर केला. शेतीवरच बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. जर पीकच राहिले नाही, तर उत्पादन येणार कुठून? शासनाने पंचनामे केले तरी लगेच मदत मिळत नाही, हा आजवरचा आमचा अनुभव आहे. तेव्हा या परिस्थितीत शेतकऱ्यालाच कर्ज काढून, उसनवारीचे पैसे घेऊन स्वतःच सारवासारव करावी लागेल.
शिवाजी निंबाळकर, शेतकरी दहीवद, नाशिक.