

नाशिकरोड : प्रफुल्ल पवार
नाशिकरोड रेल्वेस्थानक आगामी कुंभमेळ्यात प्रवाशांच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचे स्थानक राहणार आहे. सध्या या स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु या महत्वाच्या स्थानकाची सुरक्षा सध्या अवघे आठच जवान सांभाळत आहेत. यापुर्वी देशात दहशतवादी हल्ल्यांनंतर देशभरातील रेल्वेस्थानकांची सुरक्षा व्यवस्था वाढविताना नाशिकरोड रेल्वेस्थानकाला सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आलेला होता. नाशिकरोड रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या सामनाची तपासणी करण्यासाठी एकच मशीन असून तेही वापरले जात नाही. त्यामुळे या स्थानकाची सुरक्षाव्यवस्था सध्या रामभरोसे असून कुंभमेळ्यापुर्वी त्यात वाढ करणे गरजेचे आहे. दैनिक पुढारीने सुरक्षाव्यवस्था तसेच सोयीसुविधांचा घेतलेला एक आढावा...
नाशिकचे हार्ट डेस्टिनेशन म्हणून संबोधले जाणारे नाशिकरोड रेल्वे स्थानकातून दररोज १५० ते १६० प्रवासी रेल्वे गाड्याची वाहतूक होते. या रेल्वे स्थानकाला अनधिकृत आठ प्रवेशद्वार तर अधिकृत दोन प्रवेशद्वार आहे. या रेल्वे स्थानकावर सुरक्षेसाठी एमएसएफचे तीन जवान तर आरपीएफचे चार ते पाच जवान असून तब्बल चार किलोमीटर लांबीच्या फलाटासाठी अवघे सात ते आठ सुरक्षा जवानांवर सुरक्षेची जबाबदारी आहे. दररोज किमान लाखभर प्रवाशांची ये-जा असताना रेल्वे स्थानकावरील सुरक्षितता अतिशय तोकडी आहे. तर रेल्वे स्थानकात प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
महिन्याभरात या स्थानकातून 10, 447 तिकीटांचे बुकींग झाले. प्रवाशांना तब्बल दोन ते तीन किलोमीटरची चक्कर मारून बुकिंगसाठी यावे लागते. तिकीट बुक करायचे असेल तर वाहनाच्या पार्किंगसाठी पैसे मोजायला लागतात. या बाजूचे प्रवेशव्दार खुले असून तेथून कोणीही ये-जा करु शकते. शिर्डी , सिन्नर येथून आलेले प्रवासी या प्रवेशव्दाराने येतात. पण या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यांना तिकीट काढायचे असेल तर २ किलोमीटरचे अंतर पार करुन पश्चिम प्रवेशव्दारावर जावे लागते. पूर्वेकडून पश्चिम बाजूला जायचे असेल तर फलाट तिकीट काढावे लागते. अन्यथा टिसी दंड वसूल करतात.
तिकीटघर स्थानकाच्या पश्चिम बाजूला म्हणजेच शहराच्या मुख्य बाजूला आहे. येथे सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तब्बल ८००० ते ९००० दररोज प्रवासी या स्थानकावरून जातात व १५ ते २० हजार प्रवासी येतात. प्रवाशांची सदैव गर्दी या तिकीटघरात असतो. रेल्वेस्थानकाच्या पूर्व भागात आणखी एक तिकीट घर असावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रतीक्षालये भाडे तत्वावर दिलेले आहे. प्रतीक्षालय छोटे असल्याने प्रवासी जिथे जागा भेटेल तिथे स्थान मांडून बसतात. अनेक जण फलाटावरच झोपतात. रेल्वे प्रशासनाच्या दाव्यानुसार प्रतीक्षालयात १०० प्रवासी बसण्याची व्यवस्था आहे. त्यात तासानुसार पैसे मोजावे लागतात. अनेक प्रवासी स्थानकाच्या कट्ट्यांचा सहारा घेतात. पण या कट्ट्यावरून पडून अपघाताची शक्यता आहे. अनेकदा जवान झोपलेल्या प्रवाशांना उठवतात. झोपेतील प्रवासी गाडीसमोर येऊन अपघाताची दाट शक्यता आहे.
पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा चारही बाजूंनी रेल्वे स्थानकात प्रवेश करायला संधी आहे. तिकीट घरासमोर फॉर्म्युलिटी म्हणून साहित्य चेकिंगसाठी फक्त एकच मशीन आहे. या मशिनवर १० टक्केसुद्धा प्रवाशी आपले लगेज तपासत नाही. ते सरळ फलाटाकडे निघून जातात. या स्थानकावर एमएसएफचे १५ जवान आहे. त्यात एका शिफ्टमध्ये ३ ते ४ जवान सर्व स्थानक सांभाळतात. यात पार्किंग व्यवस्था, चारही फलाटांवर देखरेख ठेवावी लागते. एका फलाटाची लांबी अर्धा ते पाऊण किलोमीटर आहे. आरपीएफचे १३ जवान आहेत. पण या जवानांना घोटी ते खेरवाडी स्थानकादरम्यान सर्व सुरक्षाव्यवस्था सांभाळावी लागते. प्रवाशांची वाढती संख्या पाहता जवानांच्या संख्येत वाढ आवश्यक आहे.
स्थानकाबाहेर पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था नाही. जी पार्किंग व्यवस्था आहे ती पूर्णत: भाडेतत्वावर आहे. एखाद्या आजारी, दिव्यांग प्रवाशाला फलाटावर सोडवायचे असेल तर तेवढ्या वेळापुरती देखील गाडी उभी करायला जागा नाही १० ते १५ मिनिटाकरता देखील पार्किंचे पैसे मोजावे लागतात. गाडी पार्क करण्यास येण्यास बराच वेळ वाया जातो. तर २४ तासाकरिता टू व्हीलरसाठी ७९ रुपये फोर व्हीलरसाठी १४० रुपये मोजावे लागतात. एक तास जरी जास्त झाला तरी प्रवासाला अधिकचे पैसे मोजावे लागतात असे फलक लावण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकावर लुटमार, खिसे कापणे हे प्रकार सर्रास सुरु आहेत. फलाट चारवर अवैध धंदे खुलेआम सुरु असतात. पोलिस व जवान आपले काम चोख काम बजावत असतानाही गर्दीच्या वेळी चाकूचा धाक दाखवून प्रवाशांची लूट होते. काही दिवसांपूर्वी तिकीट तपासणीसावरच प्रवाशाने चाकूहल्ला केला होता. सामान्य प्रवाशांनाही या समस्येचा सामना करावा लागतो.
नाशिक रोड हे नाशिकचे मुख्य प्रवेशद्वार संबोधले जाते. या ठिकाणी परदेशातून पर्यटक, व्यापारी, भाविक, नोकरदार येत असतात. पण रेल्वे स्थानक बाहेर आल्यानंतर आपण दुर्गम भागात आलो की काय, असे प्रवाशांनवा वाटते. स्थानकाबाहेर खाद्य पदार्थाच्या टपऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहेच. तर रिक्षाचालक स्थानकातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना आडवत रिक्षात बसण्याची बळजबरी करतात. प्रवासी स्थानकातून बाहेर पडत असताना गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे खिसे कापले जातात.
स्थानकाच्या माध्यमातून शेकडो रिक्षाचालक आपले पोट भरतात. पण काही महाभाग अरेरावी करतात. त्यांच्यावर नाशिकरोड पोलिस स्थानकात रोज गुन्हे दाखल होतात. काही रिक्षाचालक अव्वाचा सव्वा पैसा प्रवाशांकडून वसूल करतात. काही जण प्रवाशांना दमदाटी करून बळजबरी रिक्षात बसवून अज्ञात स्थळी नेत लुटण्याचे गुन्हे नोंदविले गेले आहेत. ओला, उबेरसारख्या असंघटित रिक्षाचालकांना रेल्वे स्थानकावर प्रवासी घेण्यासाठी मनाई केली जाते. ते प्रवासी घेण्यास स्थानकावर आल्यास त्यांना मारझोड केली जाते.
स्थानकात दररोज सुमारे २०० ते २५० पार्सल येतात. तर या स्थानकावरून बाहेर जाणाऱ्या पार्सलची संख्या ११०० ते १५०० इतकी आहे. बहुतांश पार्सल पटना, दिल्लीला पाठविले जातात. रेल्वे प्रशासनाने काही बोग्या भाड्याने दिल्याने जागा कमी पडते म्हणून जास्त बुकिंग घेता येत नाही, असे रेल्वे बुकिंग अधिकाऱ्याने सांगितले.
रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकंसाठीची सुविधा कोरोनानंतर बंद केली आहे. प्रशासकीय स्तरांवर ज्येष्ठ नागरिकांना सुविधा दिल्या जात असताना रेल्वे प्रशासन सुविधा का देत नाही? असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
सरकारने महिलांसाठी शौचालच उभारण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. पण रेल्वे स्थानकावर महिलांना शौचालय सुविधेचा वापर करण्यासाठी पैसे आकारले जातात.
नाशिकरोड रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकात प्रवेशासाठी अनधिकृत प्रवेशदार असल्याने या स्थानकाच्या सुरक्षिततेला धोका आहे. रेल्वेने दोनच मुख्य प्रवेशव्दार ठेवल्यास स्थानकाची सुरक्षितता चोख राहील.
राजेश फोकणे, अध्यक्ष रेल्वे वेल्फेअर असोसिएशन
सुरक्षा दलाचे जवान व लोहमार्ग पोलिसांची संख्या अतिशय नगण्य आहे. अनेक प्रवेशव्दारांवर प्रवाशांच्या बॅगांची तपासणी होत नाही. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. कुंभमेळ्यात या स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दीची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्याचे नियोजन आत्ताच करणे गरजेचे आहे.
सुमित सोनवणे, प्रवासी