अमृत भारत योजनेतंर्गत (Amrit Bharat Station Scheme) भुसावळ मंडळातील देवळाली रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. स्थानकाचे मुळ सौंदर्य अबाधित राखताना प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर मंडळातील अन्य ८ स्थानकांचेही नुतनीकरण केले जात आहे. त्यामूळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वेस्थानक (Amrit Bharat Station Scheme) योजनेतंर्गत देशातील ५०८ रेल्वेस्थानकांचे नुतनीकरण करण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनेतून रेल्वेस्थानक कात टाकत आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला आहे.
देशातील ५०८ स्थानकांचा समावेश
महाराष्ट्रातील १२३ स्थानकांचे नुतनीकरण
पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचा हस्ते २०२३ ला योजनेचे भुमीपूजन
अमृत भारत योजनेतंर्गत (Amrit Bharat Station Scheme) रेल्वेच्या भुसावळ मंडळात देवळाली रेल्वेस्थानकाचा कायापालट केला गेला आहे. ब्रिटीश वास्तू कला प्रतिबिंबित करणाऱ्या देवळाली स्टेशनला देवळाली स्थानक विस्तीर्ण लाकूडकाम आणि लोखंडी रचनाेसाठी ओळखले जाते. जे शतकानुशतके जुने असून ते सर्व जतन केले गेले आहे. त्यामूळे स्थानकाच्या मुळ ढाच्याला काेठेही हात न लावता स्थानक परिसरातील बगिचा, पार्कींग, विद्युत रोषणाई, लिफ्ट, स्थानक प्रबंधक, पार्सल व हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिसच नुतनीकरण करण्यात येत आहे. तसेच नवीन कोच डिस्प्ले बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या सर्व कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
देवळालीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ मंडळातील मुर्तीजापूर, नांदुरा, नांदगाव, पाचाेरा, धुळे, सावदा, लासलगाव व रावेर आदी रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्यात येत आहे. रेल्वेस्थानकांच्या या कामांसाठी ११० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामूळे भुसावळ मंडळातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व आनंददायी होणार आहे.
अमृत भारत योजना रेल्वेस्थानक पुनर्विकासाअंतर्गत स्टेशनच्या दर्शनी भागात सुधारणा केली जात आहे. लँडस्केपिंगसह परिसर क्षेत्राचा विकास, लिफ्ट, पादचारी पूल, शौचालयांचे नुतनीकरण, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आधुनिक पिण्याच्या पाण्याची सोय, स्टेशनवर प्रकाश आणि वायुविजन सुधारणे, दिव्यांगांसाठी फ्लोरिंगसह सुधारित स्टेशन सरफेसिंग, नवीन सुधारित ट्रेन आणि कोच इंडिकेटर आणि साईनेज, विद्यमान बुकिंग कार्यालय, वेटिंग रूमचे नूतनीकरण यासह विविध कामांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीच्या नाशिक रोड रेल्वे स्थानकाचा विशेष निधीतून कायापालट केला जाणार आहे. मुंबई-मनमाड रेल्वेलाईनसह प्रस्तावित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे व निओ मेट्रो असे तीन बाबी डोळ्यासमोर ठेऊन स्टेशनचा मल्टी मॉडेल हब म्हणून विकास केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात नाशिकरोड रेल्वेस्थानक हे देशभरात मॉडेल स्थानक म्हणून नाव लौकिकास येईल.