भारतीय रेल्वे या नोव्हेंबरअखेर रेल्वे ३७० नियमित गाड्यांमध्ये सामान्य द्वितीय (जीएस) श्रेणीचे एक हजार रेल्वे डबे जोडणार आहेत. मध्य रेल्वेच्या ४२ गाड्यांमध्ये ९० बिगर-वातानुकूलित (नॉन एसी) डबे समाविष्ट करणार आहे. या उपक्रमामुळे द्वितीय श्रेणीतून दररोज सुमारे एक लाख अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकतील. (90 non-air-conditioned (non-AC) coaches will be included in 42 trains of Central Railway)
रेल्वेकडून पुढील दोन वर्षांत नॉनएसी श्रेणीचे दहा हजारांहून अधिक डबे ताफ्यात जोडले जाणार आहेत. सामान्य श्रेणीतील प्रवाशांसाठी सुविधांचा विस्तार करणे ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. रेल्वे प्रवासासाठी जनतेची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता त्यानुसार सुविधांच्या विस्तारालाही गती दिली जात आहे. रेल्वेने गेल्या तीन महिन्यांत विविध गाड्यांमध्ये सामान्य द्वितीय श्रेणीचे सुमारे ६०० नवीन अतिरिक्त डबे जोडले. हे सर्व डबे नियमित गाड्यांना जोडण्यात आले आहेत. नोव्हेंबर २४ पर्यंत सुमारे ३७० नियमित गाड्यांमध्ये या श्रेणीचे एक हजारांहून अधिक डबे जोडले जाणार आहेत. रेल्वेच्या ताफ्यात हे नवीन जीएस डबे जोडल्यामुळे दररोज सुमारे एक लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. दोन वर्षांत रेल्वेच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात बिगर-वातानुकूलित (नॉन एसी) श्रेणीचे डबे समाविष्ट करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
सामान्य द्वितीय श्रेणीचे कोच बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या दोन वर्षांत अशा १० हजारांहून अधिक नॉनएसी साधारण श्रेणीचे जीएस डबे रेल्वेच्या ताफ्यात जोडले जातील. यातील सहा हजारांहून अधिक जीएस कोच असतील, तर उर्वरित डबे शयनयान वर्गाचे असतील. एवढ्या मोठ्या संख्येने नॉनएसी श्रेणीच्या डब्यांच्या समावेशामुळे सामान्य वर्गातील सुमारे आठ लाख अतिरिक्त प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करू शकतील.
नॉनएसी श्रेणीचे नवे डबे एलएचबी प्रकारचे असतील. यामुळे प्रवास आरामदायी आणि सोयीस्कर बनवण्यासोबतच सुरक्षित आणि जलद प्रवासाला मदत होईल. पारंपरिक आयसीएफ रेल्वे कोचच्या तुलनेत हे नवीन एलएचबी डबे तुलनेने हलके आणि मजबूत आहेत. अपघात झाल्यास या डब्यांचे नुकसानही अत्यल्प होते. मध्य रेल्वे ४२ ट्रेनमध्ये अतिरिक्त ९० सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यासाठी तयार आहे. त्याचा फायदा दररोज नऊ हजार प्रवाशांना होईल.