

मनमाड / देवळाली कॅम्प (नाशिक) : कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी देण्यासाठी रेल्वे प्रशासन जोरदार तयारी करत आहे. तब्बल १,५०० कोटी रुपयांची विकासकामे केली जात आहे. नाशिक - मनमाड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येतील, असे गुप्ता यांनी सांगितले.
गुप्ता यांनी मनमाड ते देवळाली रेल्वेस्थानकादरम्यानच्या पाहणीदरम्यान कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मागील वेळी कुंभमेळ्यासाठी १२ लाख भाविक आले होते. मात्र, यंदा जास्त भाविक येतील, असा अंदाज आहे. त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे तयारी केली जात आहे. मनमाड ते देवळालीदरम्यानच्या पाच स्थानकांत विकासकामे केली जात आहेत. राज्य सरकारच्या साथीने विकासकामे केली जात आहेत. मनमाड ते देवळालीदरम्यान विशेष रेल्वे चालविण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांना जास्त वेळ रेल्वेस्थानकात घालवावा लागणार नाही. त्यांना १५ ते २० मिनिटांत रेल्वे उपलब्ध होईल, अशी तयारी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेस्थानकात नवीन फुटवेअर ब्रिज तयार केले जात आहे. प्लॅटफार्मची उंची वाढविण्यात येत आहे. रेल्वे गाड्यांसाठी नवीन रुळ टाकण्यात येत आहे. मनमाड - रेल्वे इंदूर मार्गासाठी भूमी अधिग्रहण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत भुसावळ विभागाचे डीआरएम पुनीत अग्रवाल, पुणे विभागाचे डीआरएम राजेशकुमार वर्मा, सिनियर डीसीएम अजय शाक्या आदींसह रेल्वेचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते.
देवळाली कॅम्प: महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी तांत्रिक पाहणीदरम्यान रेल्वे मार्गांची तांत्रिक स्थिती, सुरू असलेली विकास व देखभाल कामे, स्थानकांची एकूण स्वच्छता व स्थिती, ओव्हरहेड इक्विपमेंट, समपार फाटक तसेच महत्त्वाच्या सुरक्षिततासंबंधी पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच देवळाली, नाशिकरोड व खेरवाडी स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करत तेथील पायाभूत सुविधांच्या उभारणीचा आढावा घेतला. या महाव्यवस्थापकांनी प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छता, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.