

नाशिक: पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे संरेखन बदलून पुणे-अहिल्यानगर-साईनगर शिर्डी-नाशिक असा ८० किमी वळसा घालून करण्यात आला. याचा सर्वाधिक फटका पुणे-नाशिक औद्योगिक पट्ट्यातील मालवाहतुकीसोबत प्रवासी वाहतुकीला बसणार आहे. यासाठी प्रस्तावित करण्यात आलेले रेल्वे मार्गाचे संरेखन फेटाळण्यात यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.
भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत पुणे नाशिक सेमी हाय स्पीड थेट रेल्वे मार्गाचा समावेश करण्यात यावा. तसेच राज्य शासनाचा ५० टक्के वाटा रेल्वे मंत्रालयाला मंजूर करण्यापूर्वी महारेलमार्फत प्रस्तावित जीएमआरटी परिसरात बोगदा बांधून अंतिम आखणी सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकणमार्गेच करण्यात यावी. पुणे-नाशिक या २३६ कि. लांबीच्या नवीन सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचे बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी (महारेल) ची नियुक्ती करून आर्थिक सहभाग देण्यास शासनाने मान्यता दिली होती. डीपीआरमधील प्रस्तावित संरेखन नारायणगावमधून जात होते. जिथे राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकशास्त्र केंद्र (पुणे) यांनी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) वेधशाळा स्थापित केली आहे. जीएमआरटी वेधशाळेच्या कार्यक्षेत्रातून प्रस्तावित रेल्वे मार्ग जात असल्याने केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे संरेखन बदलून पुणे-अहिल्यानगर-साईनगर शिर्डी-नाशिक असा अतिरिक्त ८० कि. वळसा घालून करण्यात येत असल्याने पुणे नाशिक औद्योगिक पट्ट्यातील मालवाहतुकीसोबत प्रवासी वाहतुकीला याचा मोठा फटका बसणार आहे.
पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड थेट रेल्वे प्रकल्प महारेलकडे हस्तांतरीत केल्यास रेल्वे नियमांचे पालन करीत प्रकल्पाचे नियोजन आणि अमंलबजावणी करण्याची संपूर्ण जवाबदारी राज्य शासन महारेलकडे सोपवून महाराष्ट्राचे हित अबाधित राखू शकते. याचा सर्वाधिक फायदा पुणे नाशिक औद्योगिक पट्ट्याला मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत निर्यातक्षम कंटेनर मालवाहतूक रेल्वेच्या माध्यमातून वाढवण बंदराकडे करण्यासाठी शाश्वत पर्याय उपलब्ध होईल. परंतु संरेखन बदलून पुणे-अहिल्यानगर-साईनगर शिर्डी-नाशिक असा ८० कि. वळसा घालून बनविण्याचा प्रस्ताव आपल्या मंजूरीसाठी पाठवला आहे. सदर संरेखन कुठल्याही परिस्थितीत पुणे-नाशिक थेट रेल्वेमार्गास अनुसरून नसल्याने हा प्रस्ताव तातडीने फेटाळण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
पुणे-नाशिक थेट रेल्वे मार्ग संपूर्ण महाराष्ट्रातील कंटेनर मालवाहतूक मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेला बायपास करून थेट नाशिकमार्गे वाढवण बंदराला जोडली जाणार आहे. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरणांतर्गत 'इंटिग्रेटेड लॉजिस्टिक मास्टर प्लॅन'साठी तो पूरक आहे. पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे संरेखन बदलून पुणे-अहिल्यानगर-साईनगर शिर्डी-नाशिक असा ८० कि. वळसा घालून केल्यास वाढवण बंदरासोबत कनेक्टिव्हिटी बनविण्यास ते मारक ठरेल.