पंचवटी : लोकसभेमध्ये अगदी थोड्या मतांनी ज्या जागांवर पराभव पत्करावा लागला, त्याचा वचपा विधानसभेला काढू, असा दावा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर, नाशिक दक्षिण, नाशिक उत्तर, मालेगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विभागीय बैठकीप्रसंगी बोलत होते. छत्रपती संभाजी महाराज रोडवरील यश बँक्वेट हॉल येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
ते म्हणाले की, विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हपुढे आपण कमी पडलो. त्यामुळे काही जागांवर अगदी कमी मतांनी लोकसभेत आपल्याला पराभव पत्करावा लागला. देशपातळीवर आपली तयारी होती, पण राज्यपातळीवर नव्हती. चारशे पारच्या नादात आपण राहिलो. केंद्र सरकारने अनेक समाजोपयोगी योजना काढल्या असून, आपण त्याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचवलीच नाही. प्रत्येकाने केंद्राच्या योजनेचे किती फलक मतदारसंघांत लावले, असा सवाल त्यांनी पदाधिकाऱ्यांना केला.
विभागीय बैठकीच्या ठिकाणी मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरवर नाशिक महानगर, नाशिक दक्षिण, नाशिक उत्तर, मालेगाव जिल्हा असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
बैठकीला आलात आणि जेवण करून गेलात, असे करू नका. शेतकऱ्यांना आणि ग्रामीण विकासाबाबत मोदी सरकारच्या काय योजना आहेत, याबाबत पत्रक काढून वाटा. कुणी सहकार्य करत नसेल, तर जिल्हाध्यक्षांना कळवा त्यांच्यावर कारवाई करू. मुलींच्या शिक्षणाची फी माफ होणार आहे. शेतकऱ्यांचे विजेचे मागचेही बिल माफ केले. हेही बिल माफ होणार आहे. त्याचे फलक लावा. मराठा आरक्षणाबद्दल शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री राहिले, तेव्हा का बोलले नाहीत? 10 वर्षे काँग्रेसचे सरकार होते, त्यांनाही जाब विचारा, असे आवाहन त्यांनी केले. आता आपणही नॅरेटिव्ह सेट केला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
रक्षाबंधनला लाडक्या बहिणीला दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकत्रित मिळणार आहे. मोफत सिलिंडर, लाडका भाऊ योजनेची नोंदणी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आमच्या सरकारने वेळोवेळी मराठा समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे, तर ओबीसी समाजाचे आरक्षण घालविण्याचे पाप महाविकास आघाडी करत आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, संघटनमंत्री रवि अनासपुरे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी, विजय साने, गिरीश पालवे, सुनील केदार, दिलीप बोरसे, शंकर वाघ, सुनील बच्छाव आदी उपस्थित होते.