

नाशिक : गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ संस्थेच्या समन्वय समितीच्या माध्यमातून तसेच विश्वस्त बैठकीच्या ठरल्याप्रमाणे संस्थेच्या प्रमुख विश्वस्त तथा सिंहस्थ समिती अध्यक्षपदी सतीश शुक्ल यांची तर गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर पंचाक्षरी यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे पुरोहित संघाच्या अध्यक्षपदावरून सुरू झालेल्या वादावर पडदा पडला आहे.
पुरोहित संघाच्या अध्यक्षपदावरून शुक्ल यांना हटवून पंचाक्षरी यांची निवड घोषित करण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. शु्क्ल यांनी पंचाक्षरी यांची निवड अमान्य करत त्यांच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. या वादामुळे पुरोहित संघाविषयी शहरात चुकीचा संदेश जात असल्याचे लक्षात आल्यानंतर समाजातील प्रमुख मान्यवरांनी एकत्र येत या वादावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. विश्वस्तांची बैठकही घेण्यात आली. त्यानंतर सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. लवकरच दोघांच्याही सहमतीने विस्तृत कार्यकारणी घोषित करण्यात येईल आणि संस्थेचे काम आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर अधिक जोमाने करण्यात येईल असे ठरले आहे. यावेळी महंत भक्तीचरंदास महाराज, माधवदास राठी महाराज, पंडित शांताराम भानोसे, किशोर गायधनी, उदयन दीक्षित, शेखर गायधनी, सुधीर पैठणकर शेखर गायधनी, हेमंत भाई तळाजिया यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.