

नाशिक : दिलीप सूर्यवंशी
जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील 490 विद्यार्थ्यांनी सन 2023-2024 मध्ये शिक्षणाची पायरी चढताना 'स्वाधार' चा आधार घेतला, तर सन 2016-17 पासून आतापर्यंत साधारणत: 4 हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. ज्या मागासवर्गीय मुलांना मागासवर्गीय वसतिगृहात किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत भोजनभत्ता, निवासभत्ता, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा प्रदान केल्या जातात.
राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक, बिगरव्यावसायिक महविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणार्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वच विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह सुविधेचा लाभ देणे हे जागेची मर्यादा लक्षात घेता शक्य होत नाही. पर्यायाने मोठ्या संख्येने विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहतात. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शिक्षण घेण्यास मर्यादा येतात.
इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजनभत्ता, निवासभत्ता व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरिता शासनाने 6 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राज्यात 2016-17 साठी 15 हजार विद्यार्थ्यांचे, तर 2017-18 मध्ये 25 हजार विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित केलेले असताना, प्रत्यक्षात 2016 मध्ये केवळ 3,255, तर 2017 मध्ये अवघ्या 1,679 पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असावा, विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा, पात्र अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थ्यांचे कॉलेज महानगरपालिका हद्दीपासून 5 किलोमीटरच्या आत असावे, विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल, विद्यार्थ्याचे राष्ट्रीयीकृत / शेड्युल्ड बँकेत खाते असावे, पालकांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक नसावे आदी निकष आहेत.
यंदा नाशिक जिल्ह्यात स्वाधारचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत 280 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले असून, अधिकाधिक संख्येने विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे. योजनेची अंतिम मुदत 16 डिसेंबर 2024 आहे.
1) आधारकार्ड 2) जातीचे प्रमाणपत्र 3) रहिवासी दाखला 4) बँक पासबुक 5) बँक खाते आधार संलग्न 6) अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षाचा दाखला 7) 10 / 12 वी अभ्यासक्रमाचे गुणपत्रक 8) सर्व सत्र परीक्षांचे निकालपत्र 9) शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला 10) चालू वर्षाचे बोनाफाईड 11) विद्यार्थी व पालकांचे स्वयंघोषणापत्र 12) भाडेकरारनामा 13) महाविद्यालय महापालिका हद्दीपासून 5 कि.मी.च्या आत असल्याचे प्राचार्यांचे पत्र 14) उपस्थिती पत्र 15) गॅप प्रमाणपत्र 15) दिव्यांग असल्यास सक्षम प्राधिकरणाचे पत्र