

धुळे : पुढारी वृत्तसेवा
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रातील अंतर्गत वादातून गर्भवती महिलेला तब्बल २७५ किलोमीटर दूर आणत धुळे जिल्ह्यातील गरताड बारीमधील डोंगरावर आणून जिवंत जाळल्याचा गंभीर प्रकार तपासात उघड झाला आहे. या गुन्ह्यात सहा आरोपी निष्पन्न झाले असून, पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
तर दोघांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. मोहाडी पोलिस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या विश्लेषणातून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
धुळे-सोलापूर महामार्गावर गरताड बारीजवळील डोंगरावर एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. या मृतदेहाजवळ सापडलेल्या बाटलीत ज्वलनशील पदार्थ असल्याचेदेखील निदर्शनास आले होते.
तर शवविच्छेदन अहवालात ही महिला गर्भवती असल्याचे तसेच तिला जाळून ठार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्यामुळे मोहाडी पोलिस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांनी स्वतंत्र पथक तयार करून या खुनाचा तपास सुरू केला.
तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनीदेखील तपास करण्यास सुरुवात केली. प्रारंभी महिलेची ओळख पटवण्यासाठी धुळे जिल्ह्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील गुप्त माहितीदाराकडून हरवलेल्या महिलांचे रेकॉर्ड तपासण्यात आले.
अखेर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि शिल्पा पाटील, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची सलग ११ तास तपासणी केली. त्यातून एक संशयित हुंडाई मोबिलो (एम.एच. ४३ ए.आर. ४०७०) या वाहनाचे तांत्रिक विश्लेषण करून तपास केला असता ही कार अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथून आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या संवेदनशील गुन्ह्यातील अनोळखी महिला व आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहाडीनगर पोलिसांचे पथक रवाना झाले.
पथकाने जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्र येथून संशयित गाडीचालक सरफराज उर्फ शफीक अलीम मोमीन (रा. गांधीनगर, विलाल मशिदी जवळ, कळंब) व आरिफ उर्फ खुज्या आसिफ शेख (रा. इंदिरानगर, हावरगाव रोड, कळंब), सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्राची कलाकार स्वाती उर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (जामखेड), लक्ष्मी बालाजी पवार (३०, रा. बसस्टँड डेपोच्या पाठीमागे, कळंब) यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी पिंकी हनुमंत काटकर या महिलेचा खून केल्याची कबुली दिली.
यासाठी फारुख शेख (रा. कळंब) व रोहिणी जाधव (रा. केंब्रिज कॉलनी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर) यांचा देखील गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या सर्वांनी कला केंद्रातील अंतर्गत वादातून पिंकी हनुमंत काटकर (३१, रा. आदिवासी वाडी, मुखरबाची वाडी, पो. चिंचवली तर्फे आतोने, रायगड) हीस बीड येथील मांजरसुंबा चौफुली येथील एका घरात सर्वांनी मारहाण केली.
त्यात ती बेशुद्ध झाली. ती मयत झाल्याचे वाटल्याने संशयितांनी कट रचून पुरावा नष्ट करण्यासाठी वाहनात टाकून सर्वच आरोपी राजस्थानकडे जाण्यासाठी निघाले. मात्र, रस्त्यात त्यांनी धुळे तालुक्यातील गरताड बारीजवळील नरव्हाळ शिवारातील मुरमाड टेकडी लगत वनक्षेत्रात निर्जनस्थळी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारून टाकले व मालेगाव-मनमाड मार्ग जामखेड येथे निघून गेल्याची कबुली दिली. यातील चौघा आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित दोघे फरार संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.