नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासह नमामि गोदासारख्या मोठ्या प्रकल्पांची अंमलबजावणी करताना स्थानिक तज्ज्ञ तसेच जाणकारांना सोबत घ्या, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नाशिक महापालिकेला दिले आहेत. प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी स्थानिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे गेडाम यांचे मत आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिकच्या विकासाची पर्वणी ठरणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने प्रारूप आराखडा जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. त्यानुसार नाशिकमध्ये पाच ते सात हजार कोटींची विकासकामे उभी राहणार आहेत. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान मिळणार आहे. त्यासोबतच नमामि गोदावरी या प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. राज्य शासनाने अलीकडेच पर्यटन विभागासाठी २३४ कोटी रुपयांचा निधी दिला असून, हा निधी जास्तीत जास्त नाशिकला आणण्याचा प्रयत्न आहे. सर्वसाधारणपणे विशिष्ट कामांसाठी निधी आल्यानंतर सल्लागार नियुक्ती करून त्यांच्यामार्फत आराखडा तयार केला जातो. बऱ्याच वेळा सल्लागार ठेकेदाराच्या सोयीने आराखड्यात अनावश्यक गोष्टींवर निधी खर्चाचा फुगवटा तयार करतात. ही बाब लक्षात घेत, गेडाम यांनी आता नाशिकच्या विकासाच्या संदर्भात जे जे मोठे प्रकल्प करायचे आहे त्यांचे प्रस्ताव तयार करताना किंबहुना सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना स्थानिक तज्ज्ञ, नागरिक, सामाजिक संस्थांची मदत घेण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तर महाराष्ट्रमधील सर्व महापालिकांनादेखील अशाच पद्धतीने काम करण्याच्या सूचना गेडाम यांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे विकासामध्ये स्थानिकांच्या सूचनांचा व कल्पकतेचा वापर करताना जे उत्कृष्टपणे व पर्यावरणपूरकरीत्या काम करतील अशांचा पारितोषिक देऊन गौरव करण्याची सूचनादेखील गेडाम यांनी दिली आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिकच्या विकासाला चालना देणार आहे. त्याचबरोबर शहरात नमामि गोदा सारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्पदेखील प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांसाठी स्थानिकांच्या कल्पकतेचा उपयोग झाल्यास शाश्वत विकास शक्य आहे. त्यादृष्टीने सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याची संकल्पना आहे.
डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय आयुक्त, नाशिक महानगरपालिका.
कुंभमेळा आणि विकास योजनांबाबत त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने शुक्रवारी (दि. ४) कुंभमेळा नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी नगर परिषद प्रशासनाने शहरातील माजी नगरसेवक, विश्वस्त यासह काही नागरिकांना निमंत्रीत केले आहे.