

कळवण (नाशिक) : कळवण नगरपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी केंद्राच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी नगरपंचायतीच्या सभागृहात शुक्रवारी (दि. १९) आढावा बैठक झाली. बैठकीस महावितरण मंडळाचे उप कार्यकारी अभियंता योगेश जगदाळे उपस्थित होते. त्यांनी योजनेची उद्दिष्टे, लाभ, नोंदणी प्रक्रिया तसेच अंमलबजावणीबाबत माहिती दिली.
बैठकीस उपनगराध्यक्ष बाळासाहेब जाधव, नगरसेवक राहुल पगार व भारती पगार, महावितरणचे सहाय्यक अभियंता अभिजित बोळे, विस्तार अधिकारी रोहिदास कुवर, प्रशासकीय अधिकारी निवृत्ती कुवर, बांधकाम अभियंता अमोल बत्तिसे, आयसीआयसीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक स्वप्नील मुसळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक वैभव सानप, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे वेंडर तसेच कळवण नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत छतावर सौर पॅनल बसवून नागरिकांना मोफत वीज, वीजबिलात बचत व स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवण्याबाबत चर्चा झाली.
लाभार्थी नोंदणी, सौर प्रकल्पांची अंमलबजावणी, अनुदान प्रक्रिया व जनजागृती वाढवण्याच्या उपाययोजनांवर विचारमंथन झाले. अधिकाधिक नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. १०० युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या दारिद्र रेषेखालील व दारिद्ररेषेवरील सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ऑक्टोबरमध्ये शासनाने स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफटॉप सोलार योजना सुरू केली. या योजनेत लाभार्थ्यांनी २५०० ते १० हजार रुपये हिस्सा भरल्यास शासनाकडून १५ हजार ते १७ हजार ५०० रुपये व केंद्र शासनाकडून ३० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. योजनेचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कळवणचे मुख्याधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले. शहर व तालुक्यात जनजागृतीसाठी लवकरच मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.