

नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे दरवर्षी जिल्ह्यात 1 ते 30 सप्टेंबर कालावधीत राष्ट्रीय पोषण महाअभियान राबविण्यात येते. 2022 मध्ये राज्यात सर्वाधिक उपक्रम राबवून त्याची केंद्र शासनाच्या जनआंदोलन डॅशबोर्डवर यशस्वी नोंद केल्याबद्दल नाशिक जिल्ह्याला प्रथम क्रमांकाने, तर 2024-25 मध्ये उल्लेखनीय काम केल्याबाबत विशेष पुरस्काराने राज्याच्या महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे, सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे यांच्या उपस्थितीत प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. (Nashik district was awarded the first rank for its successful registration on the Central Government's Jan Andolan Dashboard)
राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. नाशिक जिल्ह्याच्या वतीने महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील तसेच पेठ प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे व हरसूल प्रकल्पाच्या मंगला भोये यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
अभियानाच्या माध्यमातून 5 उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात. कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, जन्मतः कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करणे, महिला व किशोरवयीन मुली यांच्यातील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्याबरोबरच बुटकेपणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी लोकचळवळ उभी केली जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली.
राष्ट्रीय पोषण महाअभियान हा केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून, माता व बालकांना सशक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने हे अभियान राबविण्यात येते. याच्या अंमलबजावणीबाबत सन 2022 व 2024 या दोन वर्षांत नाशिक जिल्ह्याचा सन्मान होणे ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
आशिमा मित्तल, सीईओ, जिल्हा परिषद, नाशिक.
2022 मध्ये पाचव्या राष्ट्रीय पोषण महाअभियानात जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक उपक्रम राबवले व त्यांची केंद्र शासनाच्या जनआंदोलन डॅशबोर्डवर यशस्वी नोंद केली. यामध्ये नाशिक जिल्हा राज्यात प्रथम आला. तसेच 2024 मध्ये सातव्या राष्ट्रीय पोषण महाअभियानात विविध उपक्रमांचे उल्लेखनीय काम केल्याबाबत विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभियानात प्रभात फेरी, दिंडी, विविध स्पर्धा, पोषण मेळावे, पोषण आहार व त्याचे महत्त्व, स्तनपान, वैयक्तिक स्वच्छता आदी विषयांकडे अधिक लक्ष देण्यात आले. तसेच गृहभेटीद्वारे पोषण आहार, चांगल्या आरोग्याच्या सवयी यांचे महत्त्व पटवून देण्यात आले.