नाशिक : शहर व ग्रामीण पोलिस दलाच्या भरतीत तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) किंवा इतर मागास वर्ग (ओबीसी) किंवा खुल्या प्रवर्गाची निवड करून त्याचे हमीपत्र घेण्यास सांगितले. मात्र निवड झालेल्या उमेदवारांनी हमीपत्र देण्यास आक्षेप घेतल्याने ईडब्ल्यूएस प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता ती प्रकरणे तात्पुरती स्थगित ठेवण्याचे आदेश अपर पोलिस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी दिले आहेत. तसेच इतर प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरू ठेवण्याचे आदेश आहेत.
पोलिस भरतीतील मराठा समाजाच्या उमेदवारांची निवड 'ईडब्ल्यूएस'ऐवजी एसईबीसी, ओबीसी किंवा खुल्या प्रवर्गातून करण्याचे हमीपत्र संबंधित उमेदवारांकडून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक शहर आयुक्तालयाच्या निवड यादीतील 'ईडब्ल्यूएस' प्रवर्गातील सहा मराठा उमेदवारांपैकी चौघांनी हमीपत्र देण्यास नकार दिला आहे. तर नाशिक ग्रामीण पोलिस दलात 'ईडब्ल्यूएस'मधून उत्तीर्ण झालेल्या महिला उमेदवाराने आक्षेप घेतला. त्यामुळे संबंधित उमेदवारांच्या निवडीबाबतचे मार्गदर्शन शहर पोलिसांनी महासंचालक कार्यालयाकडून मागविले होते. दरम्यान, प्रशासनाने मंगळवारी पुन्हा पत्र काढून ईडब्ल्यूएसमधून निवड झालेल्या उमेदवारांची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इतर प्रवर्गातील उमेदवारांच्या भरती प्रक्रिया सुरू ठेवण्यास सांगितले आहे.