

नाशिक: कावेरी मोरे
जिल्ह्यात पोलीस भरतीची जाहीर प्रसिध्द होताच पोलिस पदाचे स्वप्न बाळगलेल्या तरुण-तरुणींनी कसून सराव सुरु केला आहे. पोलिस परेड मैदानावर सध्या बाराशे मुले-मुली सकाळ संध्याकाळ व्यायाम तसेच मैदानी खेळांचा सराव करत आहेत. डिसेंबर अखेरीस हाच आकडा किमान तीन ते चार हजारांवर जाणार आहे.
एमपीएससीच्या तुलनेत ही परिक्षा सोपी असून उत्तम शाररीक क्षमता असलेले मुले-मुली या पदासाठी खूपच इच्छुक आहेत. त्यामुळे सध्या नाशिकमधील अनेक मैदानांवर भल्या पहाटेपासून संध्याकाळपर्यंत हे भावी पोलिस धावणे, पुश अप्स, दोरखंडावरील चढाई, लांबउडी, गोळाफेक आदींचा सराव करत आहेत. पोलिस शिपाई पदासाठी शारीरिक क्षमता महत्वाची असल्याने तंदुरूस्तीवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलेले आहेत. पोलीस भरतीसाठी 400 ते 800 मीटर धावणे, सीट अप्स, दोर उड्या आणि सायकलिंगचा सराव करत आहेत.
मुलींचा लक्षणीय सहभाग
२०२४ च्या भरतीत मुलींचाही लक्षणीय सहभाग होता. संपूर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील भरतीत सुमारे सव्वा लाख मुली सहभागी झाल्या होत्या, तर नाशिक जिल्ह्यात सुमारे वीस हजार परिक्षार्थी मुली सहभागी झाल्या होत्या. त्याही रोज सकाळी व संध्याकाळी अतिशय जिद्दीने व चिकाटीने सराव करत आहेत.
लेखी परिक्षेसाठी तयारी
शारीरिक चाचणीसोबतच लेखी परीक्षेसाठी इच्छुक कसून सराव करत आहेत. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, तर्कशास्त्र आणि गणित यांच्यावर आधारित मार्गदर्शन घेत आहेत. यात काही तरुण असे आहेत की जे दिवसभर बाहेर नोकरी करून पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. त्यांच्या दृष्टीने "नोकरी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे पण पोलीस बनणे हे त्यांचे स्वप्न आहे".
पोलिस भरतीसाठी सराव करणारे नाशिक शहरातील मुले-मुली महिन्याला दहा हजार रुपये खर्च करत आहेत. विशेष आहार, सुका-मेवा, प्रोटिन्स यासाठी ते खर्च करत आहेत. सध्या निफाड, दिंडोरी, लासलगाव येथूनही अनेक मुले परिक्षेसाठी नाशिकला खोली घेऊन राहत आहे. ते दरमहा१६-१७ हजार रुपये खर्च करत आहेत.
आहाराकडे विशेष लक्ष
भावी पोलिसांनी प्रोटीनयुक्त आहारावर भर देताना अंडी, दूध, डाळी, ड्रायफ्रूट्सला ते प्राधान्य देत आहेत. सॉफ्ट ड्रिंक, जंक फूड टाळत असून पुरेसे पाणी पिणे, रोज सहा ते आठ तास झोपला प्राधान्य देत फिटनेस राखण्यावर भर देत आहेत.
भरतीमध्ये ग्राउंड आणि लेखी दोन्ही महत्त्वाच्या आहे त्यामुळे दोन्हींमध्ये समतोल साधत आम्ही तयारी करत आहोत.
दिपाली हारडे, विद्यार्थिनी
नोकरी सांभाळून सराव करणे कठीण आहे. मी दिवसा काम करतो आणि सायंकाळी पोलीस भरतीची तयारी करतो.
करण मोरे
स्पर्धा खूप वाढली आहे पण आत्मविश्वासाने रोज आम्ही तयारी करतो. पोलीस होणे हे स्वप्न मला साकारायचे आहे.
आरती पवार, विद्यार्थिनी
लहानपणापासून पोलीस होण्याचे स्वप्न आहे आणि आई-वडिलांना आमचा अभिमान वाटावा म्हणून प्रयत्न करतोय.
देवांश यशवंते, विद्यार्थी