

नाशिक : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ नाशिकला धडाडणार आहे. नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येत्या ८ नोव्हेंबरला मोदींची नाशिकमध्ये सभा होत असून, युध्दपातळीवर या सभेचे नियोजन केले जात आहे. परतीच्या पावसाच्या शक्यतेने तपोवनातील मोदी मैदानासह ठक्कर डोम येथील सभास्थळाची चाचपणी केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता बंडखोरांच्या उमेदवारी अर्ज माघारीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ४ नोव्हेंबरला माघारी असून, ५ तारखेपासून निवडणूक प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. महायुतीकडून पंतप्रधान मोदींना प्रचाराच्या मैदानात उतरवले जाणार आहे. ५ तारखेपासून पंतप्रधान मोदी राज्यात प्रचारसभा घेणार आहेत. नाशिकमध्ये येत्या ८ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा घेण्याची तयारी सुरू आहे. मोदी ८ नोव्हेंबर रोजी धुळे जिल्ह्यात सभा घेणार आहेत. त्यानंतर नाशिकला सायंकाळी त्यांची सभा होणार असून, त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पक्षाकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत. पावसाची शक्यता असल्याने मोदी मैदान तसेच ठक्कर डोम येथील मोकळ्या मैदानात सभा घेण्याबाबतची चाचपणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
लोकसभा निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान मोदी १२ जानेवारी आणि १५ मार्च असे दोन वेळा नाशिक दौऱ्यावर आले होते. आता विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने वर्षभरात तिसऱ्यांदा त्यांचा नाशिक दौरा असणार आहे. भाजपकडून त्यांच्या सभेची तयारी सुरू झाली असून, मैदानाची चाचपणी केली जात आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही जाहीर सभांचे नियोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांची एकत्रित सभा घेण्याचाही प्रस्ताव प्रदेशाकडे पाठविण्यात आल्याचे समजते.