

पिंपळगाव (नाशिक) : येथील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला फेर आरक्षण सोडत प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि. १२) काढण्यात आली.
बुधवार (दि. ८) काढण्यात आलेल्या प्रभाग निहाय आरक्षण सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित करताना चूक झाल्याची लेखी हरकत माजी सरपंच भास्करराव बनकर, विनायक खोडे व नितीन बनकर यांनी नोंदविली होती. या तक्रारीची निवडणूक आयोगाने तात्काळ दखल घेत रविवारी फेर आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत नव्याने जाहीर केली असून यात पहिले दोन व शेवटचे दोन प्रभाग व प्रभाग क्रमांक पाच वगळता तीन, चार, सहा, सात, आठ, नऊ व दहा या प्रभागांत नव्याने सोडत जाहीर करण्यात आली आहे. याप्रसंगी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जाहीर आरक्षणावर दोन दिवसांत हरकती नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
असे आहे फेर आरक्षण
प्रभाग 1 अ- अनुसूचित जमाती, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग 2 अ- अनुसूचित जमाती, ब- सर्वसाधारण महिला
प्रभाग 3 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला
प्रभाग 4 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग 5 अ- अनुसूचित जमाती, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग 6 अ- अनुसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग 7 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला
प्रभाग 8 अ- अनुसूचित जमातीतील महिला, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग 9 अ- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला
प्रभाग 10 अ- अनुसूचित जमाती महिला, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, क- सर्वसाधारण
प्रभाग 11 अ- अनुसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारण
प्रभाग 12 अ- अनुसूचित जमाती महिला, ब- सर्वसाधारण
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाकडून शहरातील विविध ठिकाणी विचाराधीन असलेल्या मतदान केंद्रांची माहिती सादर केली आहे. कुणालाही या मतदान केंद्राबाबत काही सूचना असतील तर त्या प्रशासनाकडे मतदान केंद्रे अंतिम करण्यापूर्वी कळवाव्यात.
श्रिया देवचक्के, मुख्याधिकारी, पिंपळगाव बसवंत, नाशिक
नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची तयारी सुरू
पिंळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक प्रचंड चुरशीची आणि उत्साहपूर्ण होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. ज्येष्ठ नेते, युवा नेते तसेच काही नवखे उमेदवार आपल्या प्रभागांमध्ये तयारीसाठी सक्रिय झाले आहेत. निवडणूक पक्षीय पातळीवर होणार की गटतटाच्या स्वरूपात, हे लवकरच स्पष्ट होणार असले तरी प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), आरपीआय, मनसे आणि महाराष्ट्र निर्भय पार्टी या सर्वच पक्षांची हालचाल सुरू झाली आहे. मात्र कोणत्या पक्षांत युती होणार आणि कोण किती जागांवर लढणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
निवडणूक प्रक्रिया पुढे जात असताना नेत्यांची जुळवाजुळव, उमेदवारांची चाचपणी आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली आहे. आमदार दिलीपराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व शिंदे गटाची युती शहरात घडविण्यासाठी काही जेष्ठ व युवा नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात प्राथमिक बैठकीही झाल्याचे समजते. काँग्रेस पक्षाने देखील तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांनी स्टेट बँक शेजारील आयएमसी बँकेत आपले नाव आणि प्रभाग क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन शहराध्यक्ष दीपक बनकर यांनी केले आहे. काँग्रेस स्वतंत्र लढणार की युती करणार, हे अजून निश्चित झालेले नाही.
एकूणच, ही निवडणूक आमदार दिलीपराव बनकर, भास्करराव बनकर, दिलीपराव मोरे, विश्वासराव मोरे, तानाजीराव बनकर, सतीश मोरे, सुरेश खोडे, संपतराव विधाते, चंद्रकांत खोडे, संजय मोरे, राजेश पाटील, किरण लभडे, सत्यजित मोरे, बापूसाहेब पाटील, महेंद्र गांगुर्डे, संतोष सुराडकर, सुनील गांगुर्डे, दत्तात्रय मोरे, संतोष गांगुर्डे, दीपक मोरे आणि गणेश शेवरे यांच्या भोवती फिरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
तिन्ही बनकर एकत्र लढण्याच्या चर्चांना विराम
माजी सरपंच भास्करराव बनकर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ज्येष्ठ नेते तानाजीराव बनकर आणि स्वतःसह सहकारी व कार्यकर्त्यांसह निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आमदार दिलीपराव बनकर, तानाजीराव बनकर आणि माझा एकत्र फोटो व्हायरल झाला होता, मात्र तो फक्त धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तिन्ही बनकर एकत्र लढणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून दोन बनकर एकत्र निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे.