

नाशिक : नवीन वर्षाचा स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांचा थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनला एकदशीचा उपवास आल्याने हिरमोड झाला आहे. एकादशी लक्षात घेत अनेकांनी मंगळवारीच (ता.३०) आपले सेलिब्रेशन उरकवून घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील हॉटेल्स व पर्यटनस्थळी गर्दी दिसून आली.
सरते वर्ष २०२५ चे उद्या (ता.३१) शेवटचा दिवस असून गुरूवारपासून नववर्षारंभ होणार आहे. सरत्या वर्षाला निरोप व येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागताचा सेलिब्रेशनची क्रेज समाजात झपाट्याने वाढली आहे. तरुणाई परिसरातच कार्यक्रमाचे आयोजन करून आनंद घेतात. वृध्द मंडळी घरीच गोड-धोड,गीत-संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन करून नवीन वर्षाचे स्वागत करतात. तर काही कुटुंबे परिवारासह धार्मिक स्थळी किंवा पर्यटनस्थळी जाऊन आनंद घेतात.
त्यामागे सरत्या वर्षातील एक आठवण आणि नवीन वर्षातील सुरूवात चांगली व्हावी, हाही यामागचा उद्देश असतो. यंदा थर्टी फर्स्टला एकादशी आल्याने मांसाहार करणाऱ्यांनी आजच मंगळवारीच हॉटेल्स बुक करत सेलिब्रेशन केले. त्यामुळे दिवसभर शहरातील नावाजलेल्या हॉटेल्स परिसरात गर्दी दिसून आली. तर अनेक कुटुंबांनी त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदीर,पंचवटी परिसरात जाऊन देवी -देवतांचा मंदीरात जाऊन दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. खासकरून बालके व तरूण-तरूणींचा जत्था गोदा पार्कसारख्या पर्यटन स्थळी गर्दी करतांना दिसले.