

नाशिक : परभणी येथे आंबेडकर पुतळ्याशेजारील संविधान शिल्पाच्या तोडफोडप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला पोलिसांनी मनोरुग्ण असल्याचे सांगितल्याने आंबेडकरी जनतेत तीव्र संताप उफाळून आला असून, त्या मनोरुग्णावर होणार्या उपचाराची माहिती शासनाने त्वरित जाहीर करावी, अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (एकतावादी) दिला आहे. संघटनेने जिल्हाधिकार्यांना याबाबत निवेदन दिले आहे.
परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील संविधान प्रतिकृतीची तोडफोड केल्यानंतर परभणीत हिंसाचार उसळला. यानंतर पोलिस यंत्रणेने आरोपीला त्वरित अटक केली. मात्र, विटंबना करणारा आरोपी हा मनोरुग्ण असल्याचे यंत्रणेकडून जाहीर करण्यात आले. यामुळे आंबेडकरी जनतेत तीव्र संताप असून, आरोपी मनोरुग्ण असल्यास त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारपद्धतीचा खुलासा करावा. अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा बुधवारी (दि.12) निवेदनाद्वारे देण्यात आला
परभणी येथे हिंसाचार उसळल्यानंतर परभणीतून अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा अटकेत मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, याला नाशिकमध्ये थंड प्रतिसाद दिसून आला.
परभणी हिंसाचारप्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यू झाल्याने याप्रकरणी आंबेडकरी अनुयायांतर्फे बुधवारी शासकीय विश्रामगृहात दुपारी 12.30 वाजता सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
आदेश पगारे, नाशिक शहर अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी), नाशिक