नाशिक : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटातर्फे पाकिस्तानी ध्वजाची होळी करण्यात आली. ’पाकिस्तान मुर्दाबाद’, ’दहशतवादी संघटना मुर्दाबाद’ अशा घोषणा देतानाच, हल्ला रोखण्यात अपयश आल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरे गटातर्फे करण्यात आली.
पहलगामपासून ६ किमीवर अंतरावर असलेल्या बॅसरन व्हॅली या पर्यटनस्थळी मंगळवारी (दि.२२) दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. त्यात २६ पर्यटक मृत्युमुखी पडले असून, पाकिस्तानी 'लष्कर-ए-तोयबा'शी संबधित दहशतवादी संघटना 'टीआरएफ'ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. शिवसेनेने गुरुवारी (दि. 24) शालिमार चौक येथील पक्षाच्या कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत पाकिस्तानच्या ध्वजाची होळी केली. तसेच 'देश के इन गद्दारो को गोली मारो सालो को', 'राजीनामा द्या अमित शाह राजीनामा द्या' आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. याप्रसंगी शिवसेना उपनेते सुनील बागूल, सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, लोकसभा संघटक बाळासाहेब पाठक, कोअर कमिटी सदस्य केशव पोरजे, भारती ताजनपूरे, माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, सचिन मराठे, अस्लम मणियार आदी सहभागी झाले होते.
चांदवड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने गणूर चौफुली येथे रास्ता रोको करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला. यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानी राष्ट्रध्वज पायदळी तुडवत, 'भारत माता की जय' आदी घोषणा दिल्या. पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले.
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्याला केंद्र सरकारने जशास तसे उत्तर देऊन बदला घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख विलासराव भवर, शहरप्रमुख प्रसाद प्रजापत, संघटक सचिन खैरनार, केशव ठाकरे, गटप्रमुख अशोक शिंदे, उपतालुकाप्रमुख सागर बर्वे, शंभूराजे खैरे, सुरेश सोनवणे, तौफिक शेख, मनोज जाधव, विष्णू कोतवाल, वसीम शेख आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
नाशिक : पहलगामच्या बैसरन घाटीत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल, गुप्तचर विभागाचे मनीष रंजन यांसह २८ जणांचा मृत्यु झाला. त्यांना सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला कॅम्पसमधील शहीद स्मारकाजवळ दोन मिनिटे स्तंब्ध राहून श्रध्दांजली वाहण्यात आली.
संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, नाशिक विभागाचे कार्यवाह मिलिंद वैद्य, भोसला स्कूलचे चेअरमन आनंद देशपांडे, कमांडट संदीप पुरी, सपना पंडा यांनी स्मारकांस पुष्पचक्र वाहत, तर एनसीसी छात्रांनी वाद्यवृंदाच्या साथीने सलामी देत श्रध्दांजली वाहिली. अॅड. भिडे यांनी दहशतवादाचा एकदिलाने लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी दहशतवाद्यांचा धिक्कार तसेच राष्ट्रभक्तीपूर्ण घोषणा दिल्यात.
प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांना मनोगत व्यक्त करताना, सर्वांनी सजगता बाळगण्याची गरज आहे, काही संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.