

जुने नाशिक : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा येथील मुस्लीम समाजाकडून मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे.
ज्येष्ठ धर्मगुरू तथा खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, शहरातील मुस्लीम समाजातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या नॅशनल उर्दू कॉलेजच्या कॅम्पसमध्ये गुरुवारी (दि.२४) विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी निषेध रॅली काढली.
आतंकवादी हल्ला करणे, या कृत्याला इस्लाम धर्मात अजिबात थारा नाही. निष्पाप लोकांना जीवे ठार मारणे, हे धर्माला मान्य नाही. म्हणून मी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचे सुन्नी मर्कजी सीरत कमिटी तथा समस्त मुस्लीम समाजातर्फे खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, सारडा सर्कल येथील युथ नॅशनल कॅम्पसमध्ये या हल्ल्याच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन हल्ल्याचा निषेध नोंदविला. रॅलीमध्ये मुले व मुलींचा सहभाग होता. दरम्यान नॅशनल कॅम्पस व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष हाजी बबलू पठाण, उपाध्यक्ष सोहेल शेख, सचिव प्रा. जाहीद शेख, सहसचिव एजाज काजी, खजिनदार गौसनूर खान, कार्यकारी सदस्य अॅड. बाबा सय्यद, सलीम सय्यद, प्राचार्य तौसिफ शेख, मुख्याध्यापिका मुसर्रत शेख, उपप्राचार्य डॉ. नूरे इलाही शाह आदींनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच या भ्याड हल्ल्यातील सूत्रधारांवर कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.