

नाशिक / धुळे : धुळे जिल्ह्यातील सुप्रसिध्द आदिवासी पर्यावरणवादी तथा शाश्वत जल व्यवस्थापन क्षेत्रात देदिप्यमान कामगिरी बजावणाऱ्या चैतराम देवचंद पवार यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्यावरणदृष्ट्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पवार यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. चैतराम पवार यांनी बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपलब्ध केले आहेत. असून धुळे जिल्ह्यात ते नियमितपणे अद्यावत केले जाते. संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे. सिंचनासाठी भूजलाचा काटकसरीने वापर, मृद व जलसंधारणाची कामे, सौर ऊर्जेचा वापर, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न, सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक आदी माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने या सर्वोच्च पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना पवार यांनी संयुक्त वन व्यवस्थापन (जेएफएम ) अंमलात आणून तब्बल 400 हेक्टर्स क्षेत्रावर वनसंवर्धन केले आहे. शिवाय, स्वप्रयत्नांतून पाच हजार वृक्षांची यशस्वी लागवड केली आहे. जैवविविधतेचे रक्षण करणाऱ्या पवार यांच्या प्रयत्नांतून आठ प्राणी वर्गीय प्रजाती आणि 48 पक्षी प्रजातींचे जतन करण्यात आले आहे. तसेच वृक्ष, वेली व झुडपांच्या 435 प्रजातीही त्यांनी जतन केल्याची नोंद आहे.
माती आणि जल संवर्धनाचा वसा घेतलेल्या पवार यांनी 485 लहान तर 40 मोठ्या बंधाऱ्यांचे निर्माण केले आहे. शिवाय, 5 किलोमीटर अंतराच्या समोच्च खंदकाची निर्मिती करण्याचे श्रेय पवार यांना जाते. याच कारणाने धुळे जिल्ह्यातील भूजलपातळी वृध्दींगत झाल्याचे सिध्द झाले आहे. बारीपाडाचे सुपूत्र असलेल्या पवार यांनी शाश्वत आदिवासी विकास, पर्यावरणीय संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी या त्रिसूत्रीतून महाराष्ट्र आणि गुजरातमधील 100 हून अधिक खेड्यांचे स्वरूप पालटले आहे. वन के वनबंधू म्हणून त्यांचा सार्वत्रिक लौकिक आहे.