

सिडको (नाशिक) : घोटीजवळच्या पाडळी रेल्वेस्थानकाच्या विस्तारीकरणासाठी राज्य शासनाकडून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक येथील अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांसह जिल्ह्यातील इतर उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. वाढवण बंदरापासून निघणारा एक्स्प्रेस हायवे पाडळी रेल्वेस्थानकाला जोडण्याची राज्य सरकारची योजना आहे. पाडळीतून कंटनेरची देशभरात वाहतूक करण्याची सरकारची योजना आहे.
सद्यस्थितीत, उद्योगांना कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यामुळे उत्पादनावर आणि वितरणावर परिणाम होतो. महामार्ग लगत असलेल्या पाडळी रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण झाल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल. मुंबईकडून येणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक यामुळे अधिक जलद होईल. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया वेगवान होईल आणि उद्योजकांच्या वेळेची तसेच खर्चाची बचत होईल.
वाढवण बंदर आगामी पाच वर्षांत साकारले जात आहे. मुंबई तसेच न्हावाशेवा बंदरावर सध्या असलेला ताण कमी करण्यासाठी डहाणूजवळील वाढवण बंदराचा विकास करण्याची सरकारची योजना आहे. तेथे आखात तसेच आफ्रिकेतून येणाऱ्या मालाची तसेच तिकडे होणाऱ्या मालाची निर्यात वाढवण बंदराच्या माध्यमातून करण्याची सरकारची योजना आहे. वाढवण बंदरातून कंटेनर थेट पाडळी रेल्वेस्थानकात आणून तेथून उत्तर भारतात ते पाठविणे सोपे होणार आहे.
पाडळीच्या विकासामुळे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला नवी गती मिळेल आणि येथील उद्योगांना अधिक स्पर्धात्मक बनण्यास मदत होईल. उद्योजकांना यामुळे नवनवीन संधी उपलब्ध होतील आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे. पाडळी रेल्वे स्टेशनचा विकास व विस्तारीकरण करावे, अशी मागणी आयमा अध्यक्ष ललित बूब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ यांच्यासह सचिव योगिता आहेर, हर्षदा बेळे, खजिनदार गोविंदा झा व उद्योजकांनी केली आहे.