

Ozar Champashashti festival
ओझर : पुढारी वृत्तसेवा
'येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय' असा जयघोष करत वातावरण दुमदुमले. अख्खं गाव पिवळं झालं. मानाच्या गाड्याला सर्व गाडे जोडले गेले आणि सायंकाळी मल्हार नावाच्या अश्वाने ते ओढून यात्रेचा शुभारंभ केला. हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
जेजुरीनंतर सर्वात मोठा यात्रोत्सव ओझर येथे होतो. बुधवारी चंपाषष्ठीची पहाट उजेडताच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. दुसरीकडे बारागाडे सजवण्याचे काम सुरू होते. बारागाड्यांना मल्हार जोडून गोरज मुहूर्तावर बारागाडे ओढून यात्रेला सुरुवात झाली. ही ईश्वरी अनुभूती अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. 'सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार' च्या जयघोषाने परिसर दुमदुमला. चंपाषष्ठीनिमित्त पाच दिवस यात्रा भरते. बुधवारपासून यात्रेला प्रारंभ झाला, यात्रेत मागील वर्षापर्यंत गंग्यावारू नावाच्या अश्वाने अनेक वर्षे बारागाडे ओढले.
परंतु, त्याचा मृत्यू झाल्याने आता मल्हार नावाच्या अश्वाने गाडे ओढले मिरवणुकीसोबतच देवाची पहिली पालखी दुपारी निघाली. देवदासींचे नृत्य, गोंधळी गिते, रणशिंगांचा नाद, सोबत 'येळकोट येळकोट 'च्या जयघोषांनी वातावरण दुमदुमले. यात्रेच्या पहिल्या दिवशी आख्खं गाव पिवळं झालं. बाणगंगेतून दर्शन करून अश्व पुढे गेला. मल्हाररथ अश्वाच्या मदतीने मैदानावर पळवला गेला. स्व. विष्णुपंत पगारांचा मानाचा मोंढा गाडा, सोनेवाडी, शेजवळवाडी, मधला माळीवाडा, सिन्नरकर निंबाळकर चौधरी, समस्त पगार गवळी, रासकर, भडके, वरचा माळीवाडा, भडके कदम व इतर बारा बलुतेदार शिंदे चौधरी व अण्णा भडके यांची बैलगाडीत बाघ्या मुरळी अशा बारागाड्यांना देवाचा मल्हार जोडून गोरज मुहुर्तावर बारागाडे ओढण्यात आले. यात्रेच्या शेवटी देवांना पालखीत बसवून मानकऱ्यांच्या गृही विराजमान करण्यात येणार आहे. नगर परिषदेने सुविधा पुरवल्या आहे. शंभरहून अधिक पोलिस तैनात आहेत.
असा आहे यात्रेचा कार्यक्रम
२.३० वाजता बारागड्यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. ६ वाजता सर्व गाडे यात्रा मैदानात दाखल होताच मानाच्या गाड्यास ११ गाडे जोडून अश्वाने त्यास ओढले. गुरुवारी सकाळी हजेऱ्यांचा कार्यक्रम मंदिर शेजारी होणार आहे. दुपारी सोनेवाडी रोडवर कुस्त्यांची दंगल होईल, असे सांगण्यात आले आहे.
गंग्यावारूचे स्मारक उभारले
कित्येक वर्षे बारागाडे ओढण्याचे भाग्य गंग्यावारू नावाच्या घोड्याला मिळाले. परंतु, मागील वर्षी त्याचे देहावसान झाल्यानंतर मल्हार नावाचा अश्वाने बारागाडे ओढले. दुसरीकडे गंग्यावारूला मंदिरासमोर समाधी देत स्मारक उभारले गेले आहे.