

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राचे 'भरतपूर' तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे रामसर स्थळ म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर वन्य जीव अभयारण्यात रविवारी (दि. २८) पावसाळापूर्व पक्षी प्रगणनेत एकूण ६,२१५ पक्ष्यांची नोंद झाली. ६० हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद झाली आहे. अभयारण्यातील जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास, स्थानिक व स्थलांतरित पक्षी प्रजातींची अचूक नोंद तसेच पक्षी संवर्धनाबाबत जनजागृती या उद्देशाने नांदूरमध्यमेश्वर वन्य जीव विभागातर्फे या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत झालेल्या या प्रगणनेत विविध सेवाभावी संस्था, पक्षिमित्र, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य, स्थानिक नागरिक तसेच स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यंदाच्या पक्षी प्रगणनेचे विशेष आकर्षण म्हणजे नाशिक ते नांदूरमध्यमेश्वर अशी काढण्यात आलेली भव्य पर्यावरण जनजागृती सायकल रॅली.
नाशिक सायकलिस्ट आणि नांदूरमध्यमेश्वर वन्य जीव अभयारण्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीचे नियोजन अमित घुगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यात सुमारे ११० सायकलस्वारांनी सहभाग घेत पर्यावरण संरक्षण, प्रदूषणमुक्त वाहतूक आणि पक्षी संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला. संपूर्ण पक्षी प्रगणना उपवनसंरक्षक (वन्य जीव) कृष्णा भवर, सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
प्रगणनेदरम्यान अभयारण्यात ६० हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. यामध्ये चित्रबलाक, चमचा, हळदीकुंकू बदक, जांभळी पाणकोंबडी, गडवाल, हळद्या, राखी बगळा, सुगरण, उघड्या चोचीचा करकोचा, शेराटी, पांढऱ्या मानेचा करकोचा, लहान पाणकावळा, कपाशी घार, विविध प्रजातींचे खंड्या, बिटर्न, नदीसुराय, वारकरी आणि कापशी बदक आदी पक्ष्यांचे दर्शन झाले.
मोहिमेत पक्षिमित्र आणि वन कर्मचाऱ्यांनी क्षेत्रीय समन्वय, पक्षी निरीक्षण आणि माहिती संकलनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. प्र.भा. वनपाल कैलास सदगीर, नियत क्षेत्र अधिकारी गोरख पाटील, पक्षिमित्र भीमराव राजोळे, अनंत सरोदे, डॉ. अनिल माळी, प्रा. आनंद बोरा, आदिती शेरे, मिलिंद पेटकर, विजय बर्वे, स्वाती देसाई, नीलेश देसाई, वेद शिंदे, सर्वेश शिंदे, बी. डी. चौधरी, सिलका चौधरी आदी उपस्थित होते.
हंगामात असलेल्या पक्ष्यांची संख्या आणि प्रजातीचे जैववैविध्य हे वर्षभर व्यवस्थापनाने रबवलेल्या अधिवास संवर्धन आणि संरक्षण कामाचे यश म्हणावे लागेल. नांदूरमध्यमेश्वरला आता केवळ हंगामी पक्षी दिसत नसून, वर्षभर पक्षी दर्शन होत असल्याने पक्षिप्रेमींनी अभयारण्याला भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्वर