

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील अंगणवाडी केंद्रातून १८ महिन्यांच्या लाभार्थीस पूरक पोषण आहार स्वरूपात देण्यात आलेल्या तूरडाळ खिचडीच्या सीलबंद फूड पाकिटात मृत उंदीर सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिकार्यांनी पंचनामा करीत डाळ व अन्य साहित्य ताब्यात घेतले असून, नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी चालविल्या जातात. याठिकाणी ० ते ६ वयोगटातील मुलांचे पोषण, शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेतली जाते. त्याअंतर्गत सोनजांब येथील अंगणवाडी क्रमांक १६ मध्ये दि. २७ ऑक्टोबरला देवांश बुवा या लाभार्थीला तूरडाळ खिचडीचे पाकीट देण्यात आले होते. त्याच्या आजीने २५ नोव्हेंबर रोजी उघडताच त्यात मृत उंदीर आणि दुर्गंधीयुक्त साहित्य निघाले.
ही माहिती अंगणवाडीसेविकांना देताच त्यांनी सरपंचांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेत तथ्य आढळल्याने त्यांनी हा प्रकार त्यांच्या वरिष्ठांना कळविला. कर्मचार्यांनी पंचनामा करीत फूड पाकीट व इतर साहित्य ताब्यात घेतले असून, तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पुन्हा असा प्रकार घडल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावकर्यांनी दिला आहे.
असे प्रकार कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत. मुलांची काळजी घेण्याची सर्वस्वी जबाबदारी अंगणवाडीची आहे. घटनेचा सविस्तर अहवाल मागविला असून, कारवाईत तथ्य आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
प्रताप पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल्यकल्याण विभाग, जिल्हा परिषद,