

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्रास कर्मवीर हिरे यांचे नाव देण्याच्या कथित प्रस्तावाला युवासेने(शिंदे गटाने) कडाडून विरोध दर्शवित उपकेंद्राच्या इमारतीसमोर मंगळवारी (दि.२५) निदर्शने केली. उपकेंद्राला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची आग्रही मागणी करताना उपकेंद्राच्या इमारतीवर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर उपकेंद्र नाशिक' अशा आशयाचे फलकही झळकवले.
शिंदे गटाचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेच्या शिष्टमंडळाने उपकेंद्रातील व्यवस्थापनास निवेदन सादर केले. सावरकरांनी नाशिकमध्ये क्रांतिकारक विचार रुजवले, सशस्त्र क्रांतीचे बीजारोपण केले आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला नवा दृष्टिकोन दिला. त्यांच्या बलिदानामुळे आज आपल्याला स्वातंत्र्याच्या मुक्त गगनाखाली उभे राहता येत आहे. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांचे नाव देणे ही केवळ एक बाब नव्हे तर सावरकरांच्या विचारांना अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या शिष्टमंडळात युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख युवराज मोरे, विद्यार्थी सेना महानगरप्रमुख शुभम पाटील, आकाश आहेर, अमित खराटे, शशांक शिंदे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रास दिले तर तो एक प्रकारे त्यांच्या कार्याचा गौरव ठरेल.
आदित्य बोरस्ते, जिल्हा सरचिटणीस, युवा सेना, नाशिक.
उपकेंद्राला कर्मवीर हिरेंचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव हिरेंच्या संस्थेतील सदस्यांनी सिनेट बैठकीत सादर केला होता. त्यास विद्यापीठ विकास मंचच्या सदस्यांनी विरोध केला. या विषयावर निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. उपकेंद्राला हिरेंचे नाव देण्याचा प्रस्ताव संमत झालेला नाही.
सागर वैद्य, मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर, फुले विद्यापीठ.