Onion News Update : लासलगावहून 840 मेट्रिक टन कांदा कोलकात्याकडे रवाना

बाजारात 24 रुपये दराने होणार विक्री; दर आणखी कोसळण्याची भीती
Nashik farmers onion Market
onion NewsPudhari
Published on
Updated on

लासलगाव (नाशिक) : केंद्र सरकारतर्फे नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी केलेला कांदा आता थेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना दिलासा मिळावा या उद्देशाने हा कांदा केवळ २४ रुपये किलो दराने विक्रीस आणण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार (दि.१२) लासलगाव येथून तब्बल ८४० मेट्रिक टन कांद्याच्या २१ डब्यांचा रेल्वे रेक कोलकात्याकडे रवाना करण्यात आला.

उशिरा रात्री हा रेक निघाला असून, कोलकाता बाजारात या कांद्याचा पुरवठा केला जाणार आहे. मात्र या निर्णयाचा थेट फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसला आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर अचानक २०० रुपयांनी घसरून १००० ते १२०० रुपये क्विंटलवर आले, तर येवला बाजार समितीत दर फक्त ८५१ रुपये क्विंटलपर्यंत कोसळले.

यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांना शेतकऱ्यांची व्यथा कळवण्यासाठी नांदेड येथे आंदोलन सुरू करण्यात आले असून, पुढील टप्प्यात मुंबई व दिल्लीतील मंत्रालयांसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्पादन खर्च परत मिळणे कठीण झाले आहे. सध्या १० ते १५ रुपये किलो तोट्याने विक्री करावी लागत आहे. त्यातच सरकारने खरेदी केलेला कांदा बाजारात सोडल्याने दर आणखी पडले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ग्राहकांना दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, या घसरणीमुळे शेतकरी–सरकार संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.

Nashik farmers onion Market
Central Government Decision : केंद्र सरकार आता 24 रुपये किलोने कांदे विकणार

लासलगाव येथून थेट काेलकात्याच्या बाजारात 840 मे. टन कांदा विक्रीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना फोन करत व्यथा मांडत आंदोलन केले जाणार आहे. तातडीने दखल न घेतल्यास पुढील टप्प्यात मुंबई आणि दिल्ली येथील मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन येईल.

भारत दिघोळे, अध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news