

लासलगाव (नाशिक): बांगलादेशात कांद्याच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. काही दिवसांतच दर दुपटीने वाढल्याने स्वयंपाकघरांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. भारतातून होणाऱ्या कांदा निर्यातीवरील बंदी कायम असताना स्थानिक साठे संपुष्टात आल्याने तेथील बाजार अस्थिर झाले आहेत. बांगलादेश सरकारने स्थानिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून आयातबंदी कायम ठेवली होती. मात्र, आता जुना कांदा संपला असून, नवीन लाल कांदा जानेवारीत येणार आहे. त्यामुळे देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
त्यामुळे लासलगाव येथील निर्यातदारांनी केंद्र सरकारने हस्तक्षेप करत बांगलादेशाशी चर्चेद्वारे आयातबंदी हटवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची मागणी केली आहे. आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत सध्या कांद्याला १३ ते १७ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. त्याच वेळी बांगलादेशात १०० रुपये किलो भाव पोहोचल्याने दोन्ही देशांतील किमतीत सहापट तफावत आहे. ढाका, चितगाव, राजशाही, खुलना या शहरांत काही दिवसांतच कांद्याची किंमत झपाट्याने वाढली. बांगलादेशातील स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, देशातील साठा संपला आहे. भारताच्या निर्यातबंदीमुळे बाजार आणखी अस्थिर झाला आहे. सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरांवर याचा परिणाम होत असून, मासिक खर्चाचे गणित बिघडले आहे.
बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा आयातदार देश आहे. त्यांनी तब्बल एक वर्ष आयातबंदी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करत आयातबंदी हटवावी. भारतातून निर्यात सुरू झाली तर शेतकऱ्यांना लगेचच दोन ते पाच रुपये दरवाढ मिळू शकते.
प्रवीण कदम, निर्यातदार, लासलगाव
बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा आयातदार देश आहे. त्यांनी तब्बल एक वर्ष आयातबंदी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करत आयातबंदी हटवावी. भारतातून निर्यात सुरू झाली तर शेतकऱ्यांना लगेचच दोन ते पाच रुपये दरवाढ मिळू शकते.
प्रवीण कदम, निर्यातदार, लासलगाव