Onion Exports News : बांगलादेशाकडून आयात परवान्यात वाढ, कांदा निर्यात चौपट होणार

आयात परवाने 50 वरून 200 वर
Onion News / 
कांदा
Onion News / कांदाPudhari
Published on
Updated on

लासलगाव (नाशिक) : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या निर्णयात बांगलादेश सरकारने कांदा आयातीसाठी दिल्या जाणाऱ्या परवान्यांची संख्या थेट चौपट वाढविली आहे. सध्या दररोज ५० आयात परवाने देण्यात येत असताना, दि. १३ डिसेंबरपासून दररोज २०० आयात परवाने जारी केले जाणार आहेत. त्यामुळे भारतातून बांगलादेशात जाणाऱ्या कांद्याच्या निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे. देशांतर्गत बाजारातही कांद्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच बांगलादेशाने भारतीय कांद्याची आयात सुरू केल्यानंतर सुमारे दीड हजार टन कांदा बांगलादेशात पोहोचला. त्याचा सकारात्मक परिणाम निर्यातीवर दिसत आहे. त्याचबरोबर देशांतर्गत आणि स्थानिक बाजारपेठांत कांद्याच्या दरात हालचाल जाणवू लागली आहे. बांगलादेश सरकारने स्थानिक बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पीआयडी माहितीपत्रकानुसार प्रत्येक आयात परवान्यांतर्गत ३० टनांपर्यंत कांद्याची आयात करता येणार आहे. त्यामुळे भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी जवळपास ४० टक्क्यांहून अधिक हिस्सा एकट्या बांगलादेशाकडून खरेदी होतो. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४.८० लाख मे. टन कांद्याची निर्यात केवळ बांगलादेशात झाली होती. त्यातून देशाला १,७२४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते.

गेल्या काही आठवड्यांपासून कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नव्हता. बांगलादेशाकडून आयात वाढल्यास निर्यात खुली होईल आणि दर वाढतील, अशी आशा आहे. हा निर्णय टिकून राहिला, तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

शेखर कदम, कातरणी

बांगलादेश कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, कांद्याची बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी ही आयात प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय कांदा निर्यात आणि भाववाढीबाबत आशावाद निर्माण झाला आहे.

बांगलादेशने आयात परवाने वाढवल्यामुळे कांदा निर्यातीला मोठा हातभार लागणार आहे. मागणी वाढल्यास कांदा निर्यात होण्यास मदत होईल. लासलगाव, पिंपळगावसारख्या प्रमुख बाजारपेठांत आवक नियंत्रित होऊन भावात हळूहळू सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

विकास सिंह, कांदा निर्यातदार, लासलगाव, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news