Onion Export | कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी! निर्यात धोरणाबाबत शेतकरी संघटनेची केंद्राकडे महत्त्वाची मागणी

Onion Export | कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी
Onion
OnionPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशात कांद्याचे उत्पादन यंदा २८८.९६ लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज असून, देशांतर्गत वार्षिक गरज सुमारे २१० लाख मेट्रिक टन आहे. त्यामुळे देशाची गरज भागविल्यानंतरही कांद्याची निर्यात करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असताना, केंद्र सरकारने निर्यातीबाबत वारंवार बदलणारे निर्णय टाळून दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण निर्यात धोरण राबवावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.

Onion
Nashik Simhastha Kumbh Mela 2027 | सिंहस्थाच्या रस्ते कामांमध्ये वीजवाहिन्यांचा धोका; महापारेषणचा नाशिक महापालिकेला गंभीर इशारा!

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने १७ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या २०२५-२६ मधील फलोत्पादनाच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, देशात २८८.९६ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन अपेक्षित आहे. मागील वर्षी हे उत्पादन ३०७.६७ लाख मेट्रिक टन होते. यंदा उत्पादनात सुमारे ६.०८ टक्के घट अपेक्षित असली, तरी देशांतर्गत मागणीच्या तुलनेत उत्पादन समाधानकारक राहण्याची शक्यता आहे.

उत्पादन आणि वार्षिक गरज यातील सुमारे ७८.९६ लाख टनांचा फरक लक्षात घेता निर्यातीचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. अर्थात यामध्ये साठवणुकीतील नुकसान, बियाणे, प्रक्रिया उद्योग आणि इतर वापराचाही विचार करावा लागणार आहे. लागवड घटली तरी, उत्पादकतेत वाढ शक्य

कांद्याचे उत्पादन ठरविताना केवळ लागवड क्षेत्राचा विचार न करता हवामान, पाण्याची उपलब्धता, पीक व्यवस्थापन आणि प्रतिहेक्टर उत्पादकता या घटकांचाही विचार करणे आवश्यक आहे. काही भागांत पाणीटंचाईमुळे लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता असली तरी अनुकूल हवामान, दर्जेदार बियाणे आणि सुधारित लागवडपद्धतींमुळे उत्पादकता वाढू शकते. त्यामुळे लागवड क्षेत्रातील घट म्हणजे उत्पादनात मोठी घट होईल, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे दिघोळे यांनी स्पष्ट केले. कांदा उत्पादकांना तीन हजारांचा दर द्या

कांद्याची आवक वाढल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत दरावर दबाव निर्माण होतो. अशावेळी निर्यातीचे पर्याय खुले असल्यास अतिरिक्त कांद्याला बाजारपेठ मिळू शकते आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होऊ शकते. यासाठी आधुनिक साठवणूक व्यवस्था, प्रतवारी, पॅकिंग हाऊस, शीतसाखळी आणि कांदा प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याची मागणी संघटनेने केली आहे. कांदा पावडर, डिहायड्रेटेड कांदा आणि कांदा फ्लेक्स यांसारख्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीसाठीही स्वतंत्र योजना राबविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.

"भारताकडे कांदा उत्पादनाची क्षमता आहे. देशांतर्गत गरज भागवून जागतिक बाजारपेठेत निर्यात वाढविण्याचीही मोठी संधी आहे. मात्र, निर्यात धोरणात वारंवार बदल झाल्यास शेतकरी आणि निर्यातदारांचे नियोजन कोलमडते. त्यामुळे केंद्र सरकारने दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण निर्यात धोरण स्वीकारावे."

— भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना

लाल कांद्याचा दर ५ हजार ७०० रुपयांवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानच्या फुलकारा कांद्याची भारतीय कांद्याला स्पर्धा निर्माण झाली असताना, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र कांद्याच्या दरातील तेजी कायम आहे. बुधवारी (दि. १८) पहिल्या सत्रातील लिलावात लाल कांद्याला कमाल ५,७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. विशेष म्हणजे, हा दर चालू हंगामातील लासलगाव समितीतील सर्वोच्च दर ठरला आहे. उन्हाळ कांद्यालाही कमाल ४,५३५ रुपये भाव मिळाला.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याला पाकिस्तानच्या कांद्याची स्पर्धा निर्माण झाली असून, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील 'फुलकारा' कांद्याने आखाती देशांसह मलेशियातील निर्यात बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानच्या कांद्याचे दर भारतीय कांद्याच्या तुलनेत कमी असल्याने भारतीय कांदा निर्यातदारांसमोर स्पर्धेचे आव्हान उभे राहिले आहे. दिवाळीपूर्वी पाकिस्तानच्या फुलकारा कांद्याचे निर्यात दर ६०० ते ६५० डॉलर होते. आता हे दर घसरून ५२० डॉलरपर्यंत आले आहेत. पाकिस्तानमध्ये कांद्याचा घाऊक दर किलोमागे ४० ते ४२ रुपये असून, भारतात हाच दर सुमारे ५५ रुपये आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याच्या तुलनेत पाकिस्तानी कांदा स्वस्त आहे.

राजस्थानमधील अलवर येथील नवीन कांदा उत्तर भारतातील स्थानिक मागणी पूर्ण करीत आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील जुना गावठी कांदा संपुष्टात येत असल्याने बाजारपेठेत आवकेवर परिणाम झाला आहे. यंदा लाल कांद्याची पेरणी उशिरा झाल्याने नवीन कांद्याची काढणी आणि बाजारातील आवक सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर बाजारातील आवक वाढून दर स्थिर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Onion
Nashik ZP Election | नाशिक जिल्हा परिषद आरक्षणात मोठा बदल! ओबीसी आरक्षणाला मोठा धक्का?

लाल कांदा बाजारभाव

किमान: १,३११ रुपये

कमाल: ५,७०० रुपये

सरासरी: ४,७०० रुपये

उन्हाळ कांदा बाजारभाव

किमान: १,६५१ रुपये

कमाल: ४,५३५ रुपये

सरासरी: ४,२०० रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.