

लासलगाव : बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे भारत - बांगलादेश सीमा सील केल्या असून बांगलादेशाने भारताकडून होत असलेली शेतमालाची आयातही थांबली होती. त्यामुळे कांद्यासह इतर शेतमालाचे ट्रक सीमेजवळ अडकून पडले होते. मात्र, बुधवारी (दि. ७) पासून ही बंदी उठविण्यात आल्याने सीमेवर अडकलेला माल निर्यात होण्यास मदत होणार आहे.
देशातून सर्वात जास्त शेतमाल हा बांगलादेशला निर्यात होतो. मात्र, बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अराजकतेमुळे दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान होत आहे. कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातून दररोज ६० ते ७० ट्रक मधून दोनशे टन कांदा दररोज बांगलादेशला निर्यात होतो. मात्र, या भयावह परिस्थितीमुळे कांद्याची वाहतूक थांबली होती. मात्र, आता सीमेवरील निर्यात सुरू करण्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती कांदा निर्यातदार विकास सिंह यांनी दै. 'पुढारी' शी बोलताना दिली.
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशकडे रवाना झालेले कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकून पडले होते. केंद्र सरकारने मार्च महिन्यात व्यापाऱ्यांना कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली. बांगलादेशला ५० हजार टन कांद्याच्या निर्यातीस परवानगी देण्यात आली होती. ५० हजार टन कांद्याचा टप्पा पार करण्यापर्यंत भारतीतील कांदा निर्यातदार व शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. यातील ८० टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातून जाणार होता. मात्र, सध्या सीमा सील केल्या असल्याने कांद्याचे ट्रक जागच्या जागी थांबले आहेत. सीमेवर माल भरून अडकून पडलेले होते. आता निर्यात सुरळीत होणार असून बँकेकडून एलसी देण्यास सुरुवात होणार आहे.
गेल्या महिन्यापासून कांदा कमी झाल्याने निर्यात काहीशी घटली असली, तरी रोजच बांगलादेशच्या दिशेने कांदा भरून ट्रक रवाना होत असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. साधारण वर्षभर कमी-अधिक प्रमाणात नाशिकचा कांदा हा बांगलादेशला जातो. तिकडील कांद्याचा सिझन संपल्याने भारतासह चिनच्या कांद्याला बांगलादेशातून मागणी वाढली होती. मात्र, बांगलादेशातील अराजकतेचा फटका दोन्ही देशांतील कांदा बाजारपेठेला बसला. बांगलादेश भारताकडून बटाटे वगळता तांदूळ, गहू, आटा, डाळी, बेसन, फळे, विशिष्ट प्रजातींचे मासे, भाजीपाला, कांदा व इतर शेतमाल तसेच खाद्यान्न आयात करतो. भारतातून बांगलादेशात होणारी निर्यात सर्वाधिक आहे. मात्र, सध्या बांग्लादेशात ओढवलेल्या संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी यांचे कोट्यवधींचे व्यवहार थांबले होते.