

नाशिक : जिल्ह्यातील निर्यात उत्पादनांमध्ये कांद्याचा सर्वाधिक वाटा आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातून तब्बल एक हजार कोटी रुपयांचा कांदा परदेशात निर्यात झाला. याशिवाय २०२३ - २४ या वर्षात जिल्ह्यातून तब्बल २३ हजार २२३ कोटी रुपयांची निर्यात झाल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित निर्यात प्रोत्साहन कार्यशाळेत देण्यात आली. यातून नाशिकचे शेती क्षेत्रात अग्रगण्य योगदान अधोरेखित झाले आहे.
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने गुरुवारी (दि. ९) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्ह्यातून निर्यातीला प्राेत्साहन देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उद्योग सहसंचालक व्ही. बी. सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सोने म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातून अभियांत्रिकी, औषधी, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी उत्पादनांची मोठी निर्यात होते. कृषी उत्पादनांपैकी कांदा, द्राक्षे, डाळिंब, मनुके, भाजीपाला यांची जगभरात निर्यात केली जाते. सन २०२२-२३ मध्ये नाशिक जिल्ह्यातून १.२७ लाख टन द्राक्षांची निर्यात झाली. गेल्या वर्षी जिल्ह्याचा निर्यात कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. देशाच्या एकूण जीडीपीत महाराष्ट्राचा वाटा १४ टक्के आहे. त्यात नाशिकच्या वतीने भर घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाने स्वतंत्र निर्यात धोरण जाहीर केले असून, त्या माध्यमातून लघुउद्योजकांनी अधिकाधिक निर्यातीवर भर द्यावा.
दरम्यान, कार्यशाळेत परकीय व्यापार महासंचालनालयाचे पुणे येथील अतिरिक्त संचालक कृष्णदास यांनी निर्यात प्रोत्साहनासाठीच्या केंद्र सरकारच्या योजनांबाबत, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे राशिद सिद्दिकी यांनी त्यांच्या विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या सहायक संचालक वर्षा बारिया यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील निर्यातसंधींबाबत माहिती दिली. ठाणे जनता सहकारी बँकेचे अधिकारी सुयोग भसे, भारतीय निर्यात महामंडळाचे अधिकारी अक्षय शाह यांनी निर्यातीबाबतचे अन्य पैलू उलगडून दाखवले. महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी जिल्ह्याच्या निर्यातीची सद्यस्थिती सांगून जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मदन लोणारे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेला सूक्ष्म, लघु व मध्यम निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक आदी उपस्थित होते.
टपाल खात्याच्या वतीने डिसेंबर २०२२ पासून डाकघर निर्यात केंद्र योजना सुरू असून, तिच्या माध्यमातून ३५ किलोपर्यंतची उत्पादने जगभरातील 200 देशांत पाठवता येतात. त्यासाठी पोस्ट कार्यालयात येऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. निर्यातदार घरबसल्या ही प्रक्रिया करू शकतात, असे टपाल खात्याचे विपणन अधिकारी विठ्ठल पोटे यांनी सांगितले